शपथविधी सोहळ्यातील विविध नेत्यांच्या उपस्थितीने चर्चेला उधाण
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या नेत्यांची नावे पाहता, ही भविष्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नांदी आहे की काय अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू झाली आहे. गेली आठ वर्षे विरोधात राहून कमकुवत आणि दुर्बळ झालेल्या रालोआमध्ये मोदीच जान फुंकू शकतात, असे भाजपमधील मोदी समर्थकांचे म्हणणे आहे, तर मोदींच्या हाती भाजप नेतृत्वाची सूत्रे आल्यास राष्ट्रीय राजकारणाच्या धुव्रीकरणाला वेळ लागणार नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते.
मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अण्णा द्रमुकच्या प्रमुख व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पंजाबचे मुख्यमंत्री व अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल,
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, रिपाइं नेते रामदास आठवले या रालोआतील  विद्यमान घटक पक्ष तसेच संभाव्य मित्रपक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष यूपीएविरुद्ध सलग दोनवेळा पराभूत झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआमधील घटक पक्षांची पांगापांग झाली. मोडीत निघालेल्या रालोआची व्याप्ती वाढविण्यात मोदींचा करिश्मा पुढच्या काही महिन्यांमध्ये उपयुक्त ठरण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मोदींच्या व्यक्तिमत्त्वातील चुंबकीय आकर्षण रालोआतील समविचारी मित्रपक्षांची गर्दी वाढविण्यासाठी प्रेरक ठरू शकेल याचा अंदाज भाजप आणि काँग्रेसमधील अनेक बडय़ा नेत्यांना आला आहे. पण मोदींच्या कवेत अजूनही बिहार आलेला नाही. मोदींच्या हिंदूत्वावर नापसंतीची मोहोर उमटविताना बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे प्रमुख नितीशकुमार किंवा भाजपचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आजच्या शपथविधी सोहळ्याला मुद्दाम गैरहजर राहिले. रालोआमध्ये असलेल्या हरयाणा विकास काँग्रेसचे कुलदीप बिष्णोई तसेच आसाम गण परिषद आणि झारखंडमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधींनीही मोदींचा शपथविधी टाळला. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईकही अहमदाबादकडे फिरकले नाहीत. यूपीएमधून बाहेर पडूनही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना राज्यातील मुस्लीम मतदारांचे बाहुल्य लक्षात घेता मोदींचे आकर्षण परवडणार नाही. तीच परिस्थिती आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची आहे. मनमोहन सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा देत असलेल्या मायावतींच्या बसपने तर भाजपला दोन हात दूरच ठेवले आहे. तरीही भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा झाल्यास रालोआचा कमकुवत पाया पुढच्या काही महिन्यांत भक्कम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
मोदींच्या नावाखाली जयललिता आणि चौटाला या रालोआचे घटक नसलेल्या नेत्यांनी शपथविधीला हजेरी लावली आणि येणाऱ्या दिवसात कुंपणावर असलेल्या अनेक पक्षांचा संभ्रम दूर होऊन मित्रपक्षांचा हा गोतावळा आणखी वाढू शकतो, असे मोदी समर्थकांचा दावा आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर विविध राजकीय पक्षांना भुरळ घालण्याची क्षमता प्रशासन आणि राजकारणात खंबीर असलेल्या मोदींमध्येच असल्याचे भाजपमधील त्यांचे विरोधकही मान्य करतात.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींचे संभाव्य समर्थक  
अण्णा द्रमुकच्या प्रमुख व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पंजाबचे मुख्यमंत्री व अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, रिपाइं नेते रामदास आठवले. (हे सगळे बुधवारी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.)

संभाव्य विरोधक
बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे प्रमुख नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, हरयाणा विकास काँग्रेसचे कुलदीप बिष्णोई, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक. (हे शपथविधीस अनुपस्थित राहिले.) याशिवाय ममता बॅनर्जी, तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, मायावती हेही मोदींपासून चार हात दूर राहतील, असा कयास आहे.

काँग्रेसला फायदा?
मोदींच्या दिल्ली आगमनामुळे आमचा फायदाच होईल, असा दावा काँग्रेसचे नेते खासगीत करीत आहेत. मोदींमुळे उरल्यासुरल्या रालोआलाही खिंडार पडेल आणि जदयुसारखा मोठा घटक पक्ष त्यातून बाहेर पडेल. शिवाय धर्मनिरपेक्षतेच्या समर्थकांचे तसेच अल्पसंख्याकांच्या मतांचे ध्रुवीकरण होईल आणि त्याचा देशभर काँग्रेस-यूपीएला फायदा होईल, असा तर्कही काँग्रेसचे नेते देत आहेत.