आज (गुरुवार) सकाळी विविध भारतीय प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याच्या बातम्या दिल्या. यासाठी प्रसारमाध्यमांनी नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. पण आता अस्ले तोजे यांनी स्वत: या बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित बातम्या खोट्या असून नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत, असं आपण म्हटलो नाही, असं स्पष्टीकरण अस्ले तोजे यांनी दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर ‘ANI’ ला दिलेल्या मुलाखतीत तोजे म्हणाले, ”एका खोट्या बातमीचं ट्वीट समोर आलं होतं. मला वाटतं की, आपण त्या सर्व बातम्यांना बनावट बातम्या मानलं पाहिजे. ती खोटी बातमी आहे, त्यावर आपण चर्चा करायला नको. त्यावर चर्चा करून खोट्या बातमीला हवा-पाणी द्यायला नको. संबंधित ट्विटमध्ये जे काही लिहिलं होतं, तसं मी काहीही बोललो नाही. ट्विटमधील विधान मी स्पष्टपणे नाकारतो.”

अस्ले तोजे नेमके काय म्हणाले?

खरं तर, नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या भूमिकेचं कौतुक केलं. नोबेल समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची खूप आवश्यकता आहे.”

हेही वाचा- रशिया – युक्रेन युद्धातील मोदी सरकारच्या भूमिकेचं ‘नोबेल’ समितीकडून कौतुक

रशिया-युक्रेन युद्धावेळी मोदींनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करताना अस्ले तोजे पुढे म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या हस्तक्षेपांची गरज आहे. अण्वस्त्रे वापरण्याच्या परिणामांची रशियाला आठवण करून देण्यासाठी भारताचा हस्तक्षेप खूप महत्त्वाचा होता. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, हे युद्धांचं युग नाही. भारताने कोणताही मोठा गाजावाजा केला नाही. तसेच कोणालाही धमकावलं नाही. भारताने केवळ मैत्रीपूर्ण रीतीने आपली भूमिका जाहीर केली. जागतिक राजकारणात आपल्याला याची आवश्यकता आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is narendra modi biggest contender for nobel peace prize nobel committee asle toje dismissed said fake news rmm