आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित केलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी राज्यसभेमध्ये विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रीय हरित लवादाने या कार्यक्रमाला अटींवर मंजुरी देताना पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. पण हा दंड भरण्यास रविशंकर यांनी नकार दिला. वेळ पडल्यास तुरुंगात जाऊ पण दंड भरणार नाही, असे रविशंकर यांनी म्हटले होते. हाच मुद्दा शुक्रवारी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. रविशंकर हे कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का, असा प्रश्न संयुक्त जनता दलाचे खासदार शरद यादव यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारची पण त्याला फूस आहे का, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला. राज्यसभेमध्ये शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
प्रतिभा, प्रतिष्ठा व नावलौकिक असलेल्या लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे’ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याचे प्रस्तावित असून, सुमारे ३५ लाख लोक त्यात सहभागी होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे. पर्यावरणविषयक नियमांचा भंग होत असल्याच्या काळजीतून उद्भवलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या समारोप समारंभातून माघार घेतली आहे.
आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही – रविशंकर
राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी संस्थेला ठोठावलेला ५ कोटी रुपयांचा दंड भरण्याऐवजी मी तुरुंगात जाईन, असे रविशंकर यांनी गुरुवारी सांगितले. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही निष्कलंक आहोत आणि राहू. आम्ही तुरुंगात जाऊ पण एक दमडीही भरणार नाही, असे त्यांनी सांगितले. तुम्ही नियमांचे उल्लंघन करणार काय, असे विचारले असता रविशंकर म्हणाले की, मी नियमांचे पालन करीन पण मी काहीही चुकीचे केलेले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी एकदेखील झाड तोडण्यात आलेले नाही. फक्त काही झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत, तसेच आम्ही जमीन सपाट केली आहे असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा