योगगुरु रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेद संस्थेचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एक आठवड्याच्या आत जनतेची बिनशर्त माफी मागावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, पतंजलीने काही वर्तमान पत्रात माफीनामा प्रसिद्ध केला. परंतु,यावरून सर्वोच्च न्यायालयाने पु्न्हा एकदा पतंजलीला फटकारले आहे. पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण आणि सहसंस्थापक बाबा रामबेदव यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी न्यायप्रविष्ठ आहे. लाईव्ह लॉ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल (२२ एप्रिल) पतंजली आयुर्वेदने अनेक वर्तमानपत्रात माफीनामा प्रसिद्ध केला. दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करणे आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही पत्रकार परिषद घेणे याप्रकरणी हा माफीनामा जाहीर करण्यात आला होता. या माफीनाम्याविषयी पतंजलीचे वकिल वरिष्ठ मुकूल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले. यावेळी रामदेव बाबा आणि बाळकृष्ण दोघेही उपस्थित होते.

हेही वाचा >> “आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया

“तुम्ही केलेल्या जाहिरातीच्या आकाराएवढा हा माफीनामा आहे का?” असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. या जाहिरातींसाठी दहा लाखांचा खर्च आल्याची माहिती रोहतगी यांनी दिली असून जवळपास ६७ वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील सुनावणी आता ३० एप्रिल रोजी होणार असून पुढच्या सुनावणीत प्रसिद्ध झालेल्या माफीनाम्याचं कात्रण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“प्रसिद्ध झालेल्या माफीनाम्याचे कात्रण कापा आणि हातात ठेवा. या कात्रणांची फोटोकॉपी मोठी केल्याने आम्ही प्रभावित होणार नाही. आम्हाला जाहिरातीचा खरा आकार पाहायचा आहे. जेव्हा तुम्ही माफीनामा छापता तेव्हा आम्ही मायक्रोस्कोपने पाहावा असा त्याचा अर्थ होत नाही”, असं न्यायमूर्ती कोहली म्हणाल्या.

बाबा रामदेव जाहिरात प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

१० एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर १६ एप्रिलच्या सुनावणीस दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती.सर्वोच्च न्यायलयाने रामदेवबाबाना विचारणा केली की तुम्हाला तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का? त्यावर त्यांचे वकील मुकुल रहतोगी म्हणाले की आम्ही आता कुठलीही फाईल दाखल करणार नाही. तसंच आम्ही (रामदेवबाबा) जाहीर माफी मागायला तयार आहोत. रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर माफी मागावी आणि ती वृत्तपत्रात छापावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is your apology as big as your advertisements supreme court asks patanjali ayurved sgk