ISKCON Monk Amogh Lila Das : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण चेतना (ISKCON ) ने आपल्या संतांपैकी संत अमोघ लिला दास यांच्यावर एक महिन्याची बंदी घातली आहे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी इस्कॉनने हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

अमोघ लिला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. स्वामी विवेकानंद हे जर मासे खात असतील तर त्यांना अध्यात्मिक म्हणायचं का? असं वक्तव्य दास यांनी केलं होतं. अध्यात्मिक माणसाच्या हृदयात करुणा असते. अध्यात्मिक माणूस कधीही मासे खाणार नाही कारण माशांना वेदना होतात. त्याचप्रमाणे सिद्धपुरुष कधी हे सांगेल का की गीता पठण करण्यापेक्षा फुटबॉल खेळणं श्रेष्ठ आहे? नाही सांगणार. तुळशीच्या पानापेक्षा वांगे श्रेष्ठ आहे कारण त्याने पोट भरतं असं एखादा सिद्ध पुरुष कसं काय म्हणू शकतो? स्वामी विवेकानंदांची ही मतं मला पटणारी नाहीत. ते माझ्या समोर असते तर मी त्यांना साष्टांग नमस्कार केला असता. पण त्यांच्या या मतांशी मी सहमत नाही. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदानांना ‘जतो मत ततो पथ’ अशी शिकवण दिली होती. याचा त्यांनी उपहास केला. प्रत्येक मार्ग हा एकाच ठिकाणी जाऊन मिळत नाही असं म्हणत त्यांनी परमहंस यांच्याविषयीही वक्तव्य केलं. या दोन गोष्टींमुळे त्यांच्यावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली आहे.

अमोघ लिला दास नेमके कोण आहेत?

अमोघ लिला दास हे सोशल मीडियावरचं एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. अमोघ लिला दास यांचं खरं नाव आशिष अरोरा असं आहे. ते अध्यात्मिक गुरु, इस्कॉन मंदिर द्वारकाचे (दिल्ली) उपाध्यक्ष आहेत आणि वक्ते आहेत.

अमोघ लिला दास हे लखनौच्या एका धार्मिक कुटुंबातले आहेत. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की लहान वयातच ते अध्यात्माकडे वळले होते. २००० मध्ये त्यांनी १२ वीमध्ये असताना देवाच्या शोधात घर सोडलं होतं. मात्र ते परत आले आणि त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये त्यांनी पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या २९ व्या वर्षी अमोघ लिला दास हे इस्कॉनमध्ये सहभागी झाले आणि कृष्ण ब्रह्मचारी झाले. इंजिनिअर संत अमोघ लिला दास यांना सोशल मीडियावर अनेक लोक फॉलो करतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iscon temple monk amogh lila das banned for one month controversial statement on swami vivekananda and ramkrishna pramhansa scj