भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा लग्नसोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आनंद पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्यासोबत इशा लग्नगाठ बांधणार आहे. या सोहळ्यासाठी देशातीलच नाही तर जगातील नामांकित व्यक्ती हजेरी लावणार असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन या लग्नासाठी भारतात आल्या आहेत. यावेळी हिलरी क्लिंटन यांनी लग्नाच्या आधीच्या सोहळ्याला उपस्थित राहून नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत फोटो काढला आहे. १२ डिसेंबरला इशा आणि आनंद यांचे लग्न होणार असले तरीही लग्नसोहळ्यातील इतर विधींना सुरुवात झाली आहे. उदयपूर येथे हा भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडणार असून हिलरी क्लिंटन याठिकाणी पोहोचल्या आहेत.
याबरोबरच या सोहळ्याला मित्तल समुहाचे लक्ष्मी मित्तल, बीपी ग्रुपचे बॉब डुडले, २१ सेच्युरी फॉक्स समुहाचे सीईओ जेम्स मरडॉक, diageo चे सीईओ इव्हान मेंझेस उदयपूर येथे या जंगी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच बॉलिवूडमधील कलाकार आणि वरिष्ठ राजकीय नेते हेही या सोहळ्याला हजेरी लावतील. याबरोबरच जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी या सोहळ्याला चार चाँद लावतील. नुकताच अंबानी कुटुंबियांनी उदयपूर येथे ‘अन्न सेवे’चा कार्यक्रम घेतला. हा उपक्रम ७ ते १० डिसेंबपर्यंत सुरु राहणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. १२ तारखेपर्यंत संगीत, डान्स, मेहंदी हे कार्यक्रम होणार आहेत.
आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. पिरामल रिअल्टीपूर्वी आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची स्थापना केली होती. इशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमधून पदवी मिळवली आहे.