प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा भव्य-दिव्य शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. काही दिवस चाललेल्या या विवाहसोहळयामध्ये सगळेच भव्य-दिव्य डोळे दिपवून टाकणारे होते. ज्यांनी हा विवाहसोहळा प्रत्यक्ष अनुभवला त्यांच्या दृष्टीने कदाचित हा शतकातील सर्वोत्तम लग्नसोहळा असू शकतो.
क्रीडा, मनोरंजन, उद्योग आणि राजकारण या सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी इशा-आनंदच्या विवाहसोहळयाला नुसती हजेरीच लावली नाही तर त्यांनी संगीत सोहळयात नृत्याचाही आनंद घेतला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या माजी उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी या विवाहसोळयामध्ये भांगडा डान्सही केला. या विवाहसोहळयाला प्रसिद्धीही मोठया प्रमाणात मिळाली. या संपूर्ण लग्न सोहळयाचे छायाचित्रकरांनी १.२ लाखापेक्षा जास्त फोटो काढले.
या लग्नासाठी मंगळुरुच्या एका फोटोग्राफरची निवड करण्यात आली होती. त्यांच्या संपूर्ण टिमने विवाहातील वेगवेगळे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. १ डिसेंबरपासून पुढचे १५ दिवस विवेक सेकीरा (४७) आणि त्यांच्या टीमने हे फोटो काढले. माझ्या आयुष्यातील मी कव्हर केलेला हा सर्वात मोठा विवाहसोहळा आहे. हे स्वप्नवतच होतं असे विवेक ‘द न्यूज मिनिट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
जेव्हा मला पहिल्यादा प्रस्ताव मिळाला तेव्हा हे अंबानींच्या घरचे लग्न आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. प्रस्ताव देणाऱ्याने ‘जिंदगी बन जायेगी’ एवढेच सांगितल्याची आठवण विवेक यांनी सांगितली. सुरुवातीला मला कोणाचे लग्न आहे हे सांगण्यात आले नव्हते. जून २०१८ मध्ये मला १ ते १५ डिसेंबर दरम्यानच्या तारखा राखून ठेवण्यास सांगण्यात आल्या.
माझी निवड झाल्यानंतरही मला कोणाच्या लग्नाचे फोटो काढायचे आहेत हे सांगण्यात आले नव्हते. त्याबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती असे विवेकने सांगितले. काम सुरु करण्याआधी मानधन आणि फोटोंबद्दल गुप्तता पाळण्यासाठी विविध करार करावे लागले असे विवेक यांनी सांगितले. हा संपूर्ण विवाहसोहळा विवेक आणि त्यांच्या १७ जणांच्या टीमने कव्हर केला.