नऊ वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये कथित बनावट चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ लष्कर ए तैयबाची फियादीन अतिरेकी असल्याच्या आरोपावरून आता गुप्तचर खाते आणि सीबीआय यांच्यात चकमक सुरु झाली आहे. इशरत जहाँच्या दहशतवादी संबंधांविषयी सरकार बाहेरच्या स्त्रोतांकडून होत असलेल्या चर्चेमुळे भ्रम निर्माण होत असून याविषयी गृह मंत्रालयाने वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली.
इशरत जहाँ आणि तिच्या सहकाऱ्यांना बनावट चकमकीत थंड डोक्याने गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचा सीबीआयने आरोप केला असताना गुप्तचर खात्याने अमेरिकेत तुरुंगात असलेला मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हीड कोलमन हेडलीचा हवाला देत इशरत फियादीन अतिरेकी असल्याचा दावा गुप्तचर खात्याने केला आहे. डेव्हीड हेडलीची जबानी नोंदविण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने तयार केलेल्या ११९ पानी अहवालात इशरत लष्कर ए तैयबाची अतिरेकी असल्याचे नमूद करण्यात आले होते. गुप्तचर खात्याने चार महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे सीबीआयचे त्याकडे लक्षही वेधले होते. इशरतची लष्करने भरती केल्याचे हेडलीने सांगितले होते, तर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इशरत अक्षरधाम, सोमनाथ आणि शिरडीच्या मंदिरांना लक्ष्य करण्याच्या तयारी होती, याकडे अमेरिकन गुप्तचर यंत्रणा एफबीआयने तीन वर्षांंपूर्वी लक्ष वेधले होते. पण राष्ट्रीय तपास यंत्रणेने अन्य संस्थांना हा अहवाल सोपविताना त्यातील इशरतसंबंधीचे दोन परिच्छेद गाळल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दिग्विजय सिंह यांनी आज नॉर्थ ब्लॉकमध्ये जाऊन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आणि इशरतवरून निर्माण होत असलेला भ्रम अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. इशरतचे लष्कर ए तैयबाशी संबंध असल्याचे डेव्हीड हेडलीने खरोखरच म्हटले होते काय, ही बाब गृह मंत्रालयाने स्पष्ट करावी, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली.
हेडलीचा इशरतशी कोणताही संबंध नव्हता आणि तो ऐकीव माहितीच्या आधारे बोलत होता, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेतील सूत्रांचे म्हणणे आहे. इशरत जहाँ आणि तिचे सहकारी दहशतवादी असल्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा करताना या प्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे गृह मंत्रालयाने २००९ मध्ये म्हटले होते. पण त्यानंतर काही दिवसात गृह मंत्रालयाच्या वतीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
इशरत जहाँ : सीबीआय, गुप्तचर खाते आमनेसामने
नऊ वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये कथित बनावट चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ लष्कर ए तैयबाची फियादीन अतिरेकी असल्याच्या आरोपावरून आता गुप्तचर खाते आणि सीबीआय यांच्यात चकमक सुरु झाली आहे. इशरत जहाँच्या दहशतवादी संबंधांविषयी सरकार बाहेरच्या स्त्रोतांकडून होत असलेल्या चर्चेमुळे भ्रम निर्माण होत असून याविषयी गृह मंत्रालयाने वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली.
First published on: 06-07-2013 at 02:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishrat jahan case furious ib registers protest against witch hunting cbi