गुजरातमधील इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी गुरुवारी गुजरातमधील आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांना अटक केली. २००४ मध्ये अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱयांनी बनावट चकमक रचून इशरत जहॉंची हत्या केल्याचा आरोप आहे.
सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघल यांना अहमदाबादमध्येच अटक करण्यात आली आणि त्यांच्या घरी व कार्यालयांवर छापे टाकून तपास करण्यात आला.
बनावट चकमक घडवून आणण्यात सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप सीबीआयने प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) ठेवला आहे. अहमदाबाद ते गांधीनगर रस्त्यावर इशरत जहॉं हिच्यासोबत जावेद शेख, झिशान जोहर, अमजर अली राणा यांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २००४ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. जहॉं हिच्या आईने ही संपूर्ण चकमक बनावट असल्याची तक्रार गुजरात उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय दिला. याच पथकाने केलेल्या तपासात ही चकमक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा