पाकिस्तानातील माजी गुप्तचर अधिकाऱ्यानेच ओसामा बिन लादेनची माहिती सीआयए या अमेरिकेतील गुप्तचर संस्थेला दिली .अल काईदाचा प्रमुख असलेल्या लादेनला पकडण्यासाठी अमेरिकेने २५ दशलक्ष डॉलर्सचे इनाम लावले होते, ते पैसे त्या अधिकाऱ्यास मिळाले होते. लादेन हा अबोटाबाद येथे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा कैदी म्हणून सुरक्षेत राहत होता, असे वृत्त पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने अमेरिकेचे शोध पत्रकार सेमूर एम हर्ष यांच्या नवीन लेखनाच्या आधारे दिले आहे.
द डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे की, ऑगस्ट २०१० मध्ये माजी पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी सीआयएचे इस्लामाबाद दूतावासातील केंद्रात जोनाथन बँक यांच्याकडे आला, त्यावेळी ते सीआयएचे पाकिस्तानातील प्रमुख होते. या अधिकाऱ्याने सीआयएला लादेनची माहिती देण्याचे कबूल केले पण २००१ मध्ये अमेरिकेने जे इनाम लावले होते ते देण्याचीही मागणी केली.
 हा गुप्तचर अधिकारी आता वॉशिंग्टनमध्ये राहत असून तो सीआयएसाठी काम करतो, त्याच्याविषयी आपण अधिक सांगू शकत नाही, असे हर्श यांनी म्हटले आहे. अमेरिकेनेही या माहितीची खातरजमा केली व उपग्रह टेहळणीतून लादेनच्या अबोटाबाद येथील घरावर लक्ष ठेवले. त्यानंतर अमेरिकनांनी आयएसआयने तब्रेलातील गाझी येथे सुरू केलेल्या विभागात सील दलाच्या एका जवानास व दोन संज्ञापकास छापा टाकऱ्ण्याचे प्रशिक्षण दिले. हर्श यांनी म्हटले आहे की, ओसामाला ठार मारण्याची मोहीम अवघड होती पण नंतर पाकिस्तानला त्याची माहिती देण्यात आली. ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ओसामाला मारण्याच्या मोहिमेची जी माहिती दिली ती काल्पनिक होती प्रत्यक्षातील घटना वेगळी होती. पाकिस्तानातील लष्करी नेते जनरल अशफारक परवेझ कयानी (तेव्हाचे लष्करप्रमुख व जनरल अहमद शुजा पाशा(आयएसआयचे प्रमुख) यांना अमेरिकी मोहिमेची माहिती देण्यात आली नव्हती हे खोटे होते. जेव्हा अमेरिकेने पाकिस्तान सरकारशी संपर्क साधला व लादेनला पकडण्याचा विषय काढला तेव्हा आयएसआयने असे सांगितले होते की, लादेनला ठार मारावे व नंतर आठवडाभराने ते जाहीर करावे. हर्श यांनी सांगितले की, सौदी अरेबियालाही ओसामा बिन लादेन हा अबोटाबाद येथे आहे हे माहिती होते व त्यांनी पाकिस्तानला लादेन यास कैदी म्हणून ठेवण्याचा सल्ला दिला होता. लादेन हा आयएसआयचा कैदी होता व त्यांच्या परवानगीशिवाय बाहेर पडत नव्हता. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यावर दोष येऊ नये म्हणून लादेन हिंदुकुश पर्वतराजीत सापडला असे अमेरिकेने सांगणे अपेक्षित होते पण हर्ष यांच्या मते आयएसआयला लादेन मेलेलाच हवा होता. कारण त्यांना साक्षीपुरावे ठेवायचे नव्हते. अध्यक्ष बराक ओबामा यांनी जनरल कयानी व जनरल पाशा यांच्याशी सल्लामसलत न करता त्यांच्या देशात लादेन मारला गेल्याची बातमी थेट प्रसारित केली. त्यात तो पाकिस्तानात सापडल्याचे सांगण्यात आल्याने पाकिस्तान अडचणीत आला. पाकिस्तानच्या लष्कराला बदनाम व्हावे लागले असे सांगून हर्ष म्हणतात की, डॉ. शकील आफ्रिदी हा पेशावरचा डॉक्टर होता. त्याने सीआयएला लादेनचा नेमका ठावठिकाणा शोधण्यास मदत केली पण त्याला लादेनवर कारवाई होणार असल्याचे माहिती नव्हते, खरी कहाणी बाहेर येऊ नये म्हणून त्याचा वापर केला गेला. आता हा डॉक्टर पेशावरच्या तुरुंगात आहे. लादेन हा २ मे २०११ रोजी अमेरिकेच्या नेव्ही सीलनी केलेल्या कारवाईत मारला गेला होता.

अमेरिकेची कथा कपोलकल्पीत
हर्ष यांनी लादेनवरील कारवाईची सांगितलेली कथा लंडन रिव्ह्य़ू ऑफ बुक्समध्ये रविवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या मते ऑपरेशन नेपच्यून स्पिअर या कारवाईची अमेरिकेने सांगितलेली कथा कपोलकल्पित आहे. त्यांनी म्हटले आहे की, व्हाईट हाऊसच्या मते लादेनवरील कारवाई ही अमेरिकेपुरती मर्यादित बाब होती व पाकिस्तान लष्कर व आयएसआयला काही माहिती नव्हते. व्हाईट हाऊसने लादेनवर कारवाईची रचलेली कथा ही बहुदा अलाइस इन वंडरलँडचे लेखक लुईस कॅरॉल यांनी लिहिली असावी असे हर्श म्हणतात.

Story img Loader