अतिरेकी संघटना आयसिसबाबत गुप्तचर यंत्रणेच्या अहवालामार्फत नवीन माहिती समोर आली आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतून नव्याने दाखल झालेल्या दहशतवाद्यांना आयसिस भ्रमात ठेवते. आत्मघातकी हल्लेखोरांना फसवून आयसिस कशाप्रकारे आत्मघाती हल्ले घडवून आणते, ही माहिती या अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. एखादा दहशतवादी आयसिसमध्ये सामील झाला की त्याचे परतीचे सर्व मार्ग बंद होत असल्याची माहितीदेखील या अहवालातून मिळते. दक्षिण आशियातील दहशतवाद्यांना आयसिस संघटनेत सामील करून घेते, पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, सुदान आणि नायजेरियासारख्या देशातून आलेल्यांना इसिसमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत नाही. आयसिसच्या मते दक्षिण आशियामधून आलेले दहशतवादी हे अरब देशातील कट्टरपंथियांच्या तुलनेत कमकुवत असतात. आयसिसचे अधिकारी भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनमधून दाखल झालेल्या तरुणांच्या लग्नाबाबतदेखील दुजाभाव करतात.

फसवून बनविले जाते आत्मघातकी हल्लेखोर

आयसिसच्या अधिकाऱ्यांना दक्षिण अशियातून दाखल झालेल्या दहशतवाद्यांच्या जिवाची काडीमात्र किंमत नसल्याचे गुप्तचर अहवालातून स्पष्ट होते. अरब देशातील दहशतवादी सुरक्षित राहावेत म्हणून या देशातील तरुणांना लढण्यासाठी युद्धात पहिल्या रांगेत उभे केले जाते. कमकुवत मानले जाणाऱ्या दक्षिण आशियातील तरुणांना अंधारात ठेऊन अनेकवेळा आयसिस त्यांचा आत्मघातकी हल्लेखोर म्हणून वापर करते. हल्लाच्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेले वाहन नेऊन तेथून फोन करण्याचे निर्देश आयसिसच्या अधिकाऱ्यांद्वारे त्यांना देण्यात येतात. फोन कॉल करताच स्फोट होऊन आपणदेखील त्यात मारले जाणार असल्याची सुतराम कल्पना त्या तरुणांना नसते. इराक आणि सीरियामध्ये आयसिसने अशाप्रकारे अनेक आत्मघाती हल्ले घडवून आणले आहेत.

दहशतवाद्यांना पिशाचाची भीती दाखवली जाते

दक्षिण आशियातून संघटनेत दाखल झालेल्या नव्या दहशतवाद्यांचा ‘ब्रेन वॉश’ करण्यासाठी आयसिस एका खास पद्धतीचा अवलंब करते. या तरुणांना पिशाचाचे भय दाखवून ते कधीही आपल्या घरी परतणार नाहीत याची खातरजमा केली जाते. स्वत:च्या देशात परतल्यास जीवनभर पिशाचापासून सुटकारा मिळणार नसल्याची भीती त्यांच्या मनात जागवली जाते. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशातून आलेल्या या दहशतवाद्यांनी इराक किंवा सीरियाच्या भूमीवर पाय ठेवताच त्यांचे ‘पासपोर्ट’ जाळून टाकण्यात येत असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader