ISIS Chief Abu Bakr Al-Baghdadi :आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने तब्बल पाच वर्षानंतर व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओनंतर बगदादीने ऑडियो क्लिपही जारी केली असून यात त्याने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांवर भाष्य केले आहे. जुलै २०१४ नंतर बगदादी पहिल्यांदाच व्हिडिओत दिसला आहे.
आयसिस या दहशतवादी संघटनेने सोमवारी बगदादीचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत बगदादी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या मागे अत्याधुनिक शस्त्र देखील दिसत आहे. व्हिडिओत बगदादी हा तीन जणांशी बोलत असून त्या तिघांचे चेहरे मात्र दाखवण्यात आलेले नाही. व्हिडिओत बगदादी म्हणतो, “बागूजमधील युद्ध संपले आहे”. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सीरियातील बागूज येथे आयसिस आणि सैन्यात सुरु असलेले युद्ध गेल्या महिन्यात संपले होते. बगदादीचा हा व्हिडिओ १८ मिनिटांचा असून तो अरबी भाषेत बोलत आहे.
“बागूजमधील रक्तरंजित संघर्षाचा बदला श्रीलंकेतील तुमच्या बांधवानी घेतला आहे”, असे त्याने व्हिडिओच्या शेवटी जारी करण्यात आलेल्या ऑडियो टेपममध्ये म्हटले आहे. आमचा लढा सुरुच राहणार आणि आम्ही बदला घेणारच, अशी धमकीही त्याने दिली आहे. यापूर्वी बगदादी मोसूलमधील एका मशिदीत भाषण करतानाचा व्हिडिओ २०१४ मध्ये जारी करण्यात आला होता. २०१५ मध्ये आणि गेल्या वर्षीही बगदादीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. आता बगदादीचा नवा व्हिडिओ जारी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.