बांगलादेश पोलिसांनी अलीकडेच अल्पसंख्याक व धर्मनिरपेक्ष लोकांची हत्या केल्याच्या प्रकरणात १७०० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात बेकायदा दहशतवादी संस्थांच्या सदस्यांचा समावेश आहे. एकूण १७४० जणांना पकडण्यात आले असून पोलीस अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीनंतर दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. आठवडाभराच्या मोहिमेत पहिल्या दिवशी १६०० जणांना देशभरात ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर इतर जिल्ह्य़ातून १४० जणांना ताब्यात घेतले आहे असे द डेली स्टार या वृत्तपत्राने म्हटले आहे.
१४० जणांमध्ये ८८ जण राजशाही जिल्ह्य़ातील आहेत, तर ३५ सातखिरा व १७ नाटोरे येथील आहेत. राजशाही येथे ताब्यात घेतलेल्या ८८ पैकी नऊजण हे प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे आहेत. त्यातील आठजण जमातउल मुजाहिद्दीन बांगलादेशचे सदस्य आहेत. एकजण जाग्रता मुस्लीम जनात बांगलादेश या संघटनेचा सदस्य आहे असे राजशाहीचे सहायक पोलीस अधीक्षक शरीफुल आलम यांनी सांगितले. बांगलादेशात इस्लामी दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले असून त्यात धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आले आहे.
आयसिसने जबाबदारी स्वीकारली
बांगलादेशातील पबना येथे एका हिंदू मठातील सेवकाची हत्या केल्याच्या प्रकरणी आयसिसने जबाबदारी स्वीकारली आहे. आयसिसशी संबंधित अमाक वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, आयसिसच्या लोकांनी हिंदू धर्मगुरूची हत्या केली आहे. नित्यरंजन पांडे (वय ६०) हे ठाकूर अनुकूल चंद्र सत्संग परममित्र हेमायतपुरधाम आश्रम या संस्थेत स्वयंसेवक होते. त्यांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. पबनातील हिमायतपूर उपजिल्ह्य़ात ही घटना घडली होती. त्याआधी हिंदू धर्मगुरू, ख्रिश्चन व्यापारी व दहशतवाद विरोधी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी यांचे अशाच क्रूर पद्धतीने खून करण्यात आले होते.