प्राध्यापक गंभीर जखमी ; आयसिसने जबाबदारी स्वीकारली
बांगलादेशात शनिवारी एका होमिओपॅथी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून, आणखी एक प्राध्यापकही हल्ल्यात जखमी झाला आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी कोयत्याने हे हल्ले केल्याचे समजते. ठार करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव सनाउर रहमान असून, ते इस्लाम विद्यापीठातील बांगला साहित्याचे सहायक प्राध्यापक सैफुझमान यांना मोटारबाईकवर घेऊन घरी चालले होते त्या वेळी कुश्तिया शहरात आज सकाळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात रहमान हे जागीच ठार झाले तर सैफुझमान यांना ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. सनाउर रहमान व सैफुझमान हे शिशिरमठ येथील त्यांच्या मूळ गावी लोकांवर मोफत उपचारासाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. कुश्तियाचे पोलीस अधिकारी शहाबुद्दीन चौधरी यांनी सांगितले. मोटारसायकलवरून जात असताना त्यांना तीन ते चार जणांनी हटकले व नंतर बेछूटपणे कोयत्याने हल्ला केला. त्यांनी पूर्वी ब्लॉगर्सचीही हत्या याच पद्धतीने केली होती. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या योद्धय़ांनी ख्रिश्चनांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टरला पश्चिम बांगलादेशातील कुश्तिया येथे ठार मारले आहे असे आयसिसशी संबंधित अमाक न्यूज एजन्सीने अरबी भाषेत म्हटले आहे. हे व्यक्तिगत वैमनस्यातून झाले, की दहशतवादी प्रकार होता याचा तपास चालू आहे. हे डॉक्टर व प्राध्यापक दोघेही बौल नावाच्या संगीत परंपरेचे शौकीन होते. ही संगीत परंपरा पश्चिम बांगलादेशात लोकप्रिय आहे. रहमान हे संगीत मैफलींचे आयोजन करीत असत व त्यात शुक्रवारी अशी मैफल त्यांच्या गावी आयोजित केली होती.