बांगालदेशात हिंदू मंदिरातील पुजाऱ्याच्या हत्येची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. हल्लेखोरांनी बंदुका व कोयत्याने पुजाऱ्याला ठार केले होते. धार्मिक अल्पसंख्याकांवर तेथे नेहमी हल्ले होत आले असले तरी हिंदू पुजाऱ्यावर प्रथमच हल्ला झाला आहे. अमेरिकेतील ‘साईट’ या गुप्तचर गटाने म्हटले आहे की,उत्तर पंचगड जिल्ह्य़ातील देवीगंज येथे पहाटेच्यावेळी सोनापोटा खेडय़ात जग्नेश्वर रॉय या पन्नास वर्षे वयाच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आली, त्यात दोन भक्तगणही जखमी झाले.

साईट हा गुप्तचर गट आयसिसच्या कारवायांवर लक्ष ठेवीत असून त्यांनी म्हटले आहे की, आयसिसने ट्विटरवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दाव्याची खातरजमा करता आली नाही. मोटरसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी रॉय यांच्या घरावर दगडफेक केली, संतागौरियो मंदिराच्या परिसरात त्यांचे घर आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्य़ांनी तुडवले, नंतर त्यांनी त्याचा गळा चिरला. रॉय यांनी १९९८ मध्ये हे मंदिर सुरू केले होते व तेच मुख्य पुजारी होते.

हिंदू धर्मगुरूवर झालेला हा पहिला हल्ला आहे, याआधी शिया व सुफी धर्मोपदेशकांवर सहा महिन्यात अनेक हल्ले झाले आहेत.

पोलिसांनी हा हल्ला आयसिसने केल्याबाबत शंका व्यक्त केली असून प्राथमिक चौकशीनुसार जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश व जमाते इस्लामी या दोन संघटनांचा या हल्ल्यात हात आहे.

Story img Loader