इराक आणि सीरियासारखी विध्वंसक परिस्थिती घडवून आणण्यासाठी आयएसआयएस या जागतिक इस्लामी दहशतवादी संघटनेने इंडियन मुजाहिदीनला फूस दिली असून त्यांच्या सूचनेनुसार मुजाहिदीन कारवाया करीत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी येथे न्यायालयात सांगितले. इंडियन मुजाहिदीनने आपल्यासमोर आयएसआयएस या संघटनेचा ‘आदर्श’ ठेवला आहे, असेही एनआयचे म्हणणे आहे.
इंडियन मुजाहिदीन ही संघटना आपल्या काही समर्थकांना ‘जिहाद’साठी सीरियात पाठवू इच्छित असल्याचे तपासाअंती आढळून आल्याची माहिती एनआयएने न्यायालयास दिली. त्याद्वारे आयएसआयएसशी ते संधान बांधीत आहेत. आपण जिहादींसाठी काम करू इच्छित आहोत, असे इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मोहम्मद शफी आरमर या बेपत्ता समर्थकाने ई-मेलवरून पाठविलेल्या संदेशात म्हटले असल्याचे एनआयएने सांगितले. ‘ए-२६’ हा त्याचा गुप्त क्रमांक होता. इराक आणि सीरियामध्ये सध्या सातत्याने दहशतवादी कारवाया सुरू असून तेथे हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. आपण भारतातही तशाच कारवाया व्हाव्यात, अशीही ‘इच्छा’ त्याने व्यक्त व्यक्त केली आहे. ‘एनआयए’ने इंडियन मुजाहिदीनच्या २० संशयित दहशतवाद्यांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या २० जणांपैकी अद्याप १७ जणांना अटक करण्यात आली नसून तेहसीन अख्तर, हैदर अली व झिया उर रेहमान हे तिघेजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. देशभरात मोठय़ा प्रमाणावर दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. अब्दुल खादीर सुलतान आरमर हा फरार आरोपी सीरियाला जायच्या तयारीत असून अन्य आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसमवेत त्याला भारतात ‘धार्मिक युद्ध’ छेडायचे आहे, अशी माहिती ‘एनआयए’ने न्यायालयास दिली.
मोहम्मद शफी आरमर याही अतिरेक्याने सीरिया आणि अफगाणिस्तानातील विविध भागांत जायची तयारी केली असून त्यासाठी त्याने अल-कायदासमवेतही संधान बांधले आहे.