सीरियातील इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण जगालाच धोका असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. आयसिसच्या संभाव्य कारवायांबाबत केंद्र सरकार पूर्णपणे सावध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात आयसिसच्या सात दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यात १३० नागरिकांचा बळी गेला होता. पॅरिसमधील रेस्टॉरंट, कॉन्सर्ट हॉल, नॅशलन स्टेडियमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राजनाथ सिंह यांनी आयसिसचा कोणत्या एका देशाला नव्हे तर संपूर्ण जगालाच धोका असल्याचे सांगितले.
देशाच्या वेगवेगळ्या भागातील सुमारे २० तरूण सध्या आयसिसमध्ये कार्यरत असल्याची शक्यता आहे. यामध्ये कल्याणमधील दोन युवकांचाही सहभाग आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीच ही माहिती दिली आहे. भारतामध्ये सध्या थेटपणे आयसिसकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र, देशातील काही कट्टरपंथीय युवकांना आकर्षित करण्यासाठी आयसिस प्रयत्नशील असल्याचेही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले.

Story img Loader