आयसिस या दहशतवादी गटाने दोन वर्षांच्या कालावधीत ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी घेतले असल्याचे ब्रिटनमधील एका मानवाधिकार संस्थेने सांगितले असून, सीरियातील लोकांवर ही संघटना करीत असलेले अत्याचार थांबवण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांना केले आहे.
आयसिसने जून २०१४ मध्ये संघटनेची घोषणा केल्यापासून लोकांचा शिरच्छेद करणे, त्यांना गोळ्या घालणे, दगडाने ठेचून मारणे यांसह उंच इमारतीवरून खाली फेकणे किंवा त्यांना पेटवून देणे अशा प्रकारांनी केलेल्या खुनांची यादी ब्रिटनमधील सीरियन ऑब्झव्र्हेटरी फॉर ह्य़ूमन राइट्स (एसओएचआर) या संघटनेने तयार केली आहे. ज्या कथित गुन्हय़ांसाठी आयसिसने लोकांना ठार केले आहे, त्यात पुरुष समलैंगिकता, धर्मत्याग आणि दारूची तस्करी यांचा समावेश आहे. आयसिसच्या तथाकथित ‘खलिफात’ राजवटीच्या बाविसाव्या महिन्याअखेरीस ४१४४ लोकांना ठार मारण्यात आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यापैकी बहुतांश, म्हणजे अंदाजे २२३० जण नागरिक असून त्यात सुन्नी व कुर्दिश नागरिकांच्या तीन वेळा मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेल्या नरसंहाराचा समावेश आहे.
महिला आणि मुलांसह हजारो नागरिकांना तर आयसिसने मारले आहेच, शिवाय याच संघटनेचे शेकडो सदस्य आणि बशर-अल-असद सैन्याचे शत्रुसैनिक आणि विरोधी बंडखोर गटाच्या सदस्यांचाही त्यात समावेश असल्याचे वृत्त ‘दि इंडिपेंडंट’ने दिले आहे.
‘इस्लामिक स्टेट’ ही संघटना गैरइस्लामीच नव्हे तर अमानुषही आहे. एका युवकाने स्वत:च्या सख्ख्या भावाला हेर असल्याच्या संशयावरून ठार मारले. आयसिसच्या लोकांनी त्याला तसा आदेश दिला होता, असे काही दिवस आयसिसमध्ये सहभागी झालेल्या लंडनच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले.
आयसिस तसेच बशर-अल-असद राजवटीकडून सीरियन लोकांविरुद्ध होत असलेले गुन्हे आणि मानवाधिकारांचा भंग थांबवण्यासाठी गांभीर्याने काम करावे, असे आवाहन एसओएचआरने केले आहे.
आयसिसकडून दोन वर्षांमध्ये चार हजार लोकांचे बळी
आयसिस या दहशतवादी गटाने दोन वर्षांच्या कालावधीत ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी घेतले

First published on: 02-05-2016 at 01:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis killed 135 people to 400 people this year