ISIS Leader Abu Khadijah Killed : अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) फोर्सेस आणि इराकी इंटेलिजन्स अँड सेक्युरिटी फोर्सेसने केलेल्या संयुक्त कारवाईत आयसीसचा प्रमुख नेत्यांपैकी एक अब्दल्ला मक्की मुसलीह अल-रिफाई (Abdallah Makki Muslih al-Rifai) उर्फ अबू खादीजा (
Abu Khadijah) याला ठार करण्यात आले आहे. अबू खादीजा हा आयसीसीचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता आणि त्याच्याकडे जगभरातील कारवायांची जबाबदारी होती. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या या एअर स्ट्राइकच्या माध्यमातून अबू खादीजा आणि आणखी एका आयसिस ऑपरेटीव्ह ठार झाल्याची माहिती सेंटकॉम (Centcom)ने दिले आहे.
या हवाई हल्ल्यानंतर सेंटकॉम आणि इराकच्या लष्कराने या भागाचा ताबा घेतला आणि डीएनए मॅचिंगच्या माध्यमातून अबू खादीजाची ओळख पटवली.
स्ट्राइकनंतर, सेंटकॉम आणि इराकी सैन्याने स्ट्राइक साइटवर दाखल झाले आणि त्यांना दोन्ही मृत आयसिस दहशतवादी आढळून आले. दोन्ही दहशतवाद्यांनी न फुटलेले आत्मघाती जॅकेट घातले होते आणि त्यांच्याकडे अनेक शस्त्रे होती, अशी माहिती देखील अमेरिकन सैन्याने त्यांच्या निवेदनात दिली आहे.
यूएस सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल मायकल इरिक कुरिल्ला यांनी या हवाई हल्ल्याचे महत्त्व सांगताना म्हणाले की, अबू खादीजा हा जगभरातील आयसिस संघटनेतील सर्वात महत्त्वाचा आयसिस सदस्य होता. आम्ही दहशतवाद्यांचा नायनाट करत राहू आणि आपली मातृभूमी आणि अमेरिकेला, या प्रदेशातील आणि त्यापलीकडील मित्रराष्ट्र आणि भागीदारांना धोका निर्माण करणाऱ्या संघटनांना उखडून टाकू.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराक येथे इराकी आणि कुर्दीश सैन्याच्या मदतीने आयसिस नेत्याला ठार केल्याची घोषणा केली होती. दरम्यान अमेरिकेने दहशतवादी संघटनेच्या विरोधात युद्ध पुकारले असून याचाच भाग म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आला, ज्यामुळे आयसिसला मोठा झटका बसला आहे.
अबू खादीजा कोण होता?
अबू खादीजा याच्याकडे दहशतवादी संघटनेतील ‘अमीर ऑफ आयसिस’ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे पद होते. त्याच्याकडे संघटनेच्या जगभरातील कारवाया, लॉजिस्टीक आणि आर्थिक नियोजनाची जबाबदारी होती.
सेंटकॉमने त्यांच्या निवेदनात माहिती दिली की, ‘अमीर ऑफ आयसीस’ म्हणून संघटनेतील सर्वात वरिष्ठ पद असलेल्या अबू खादीजा याच्याकडे जगभरातील ऑपरेशन्स, लॉजिस्टीक्स आणि प्लॅनिंगची जबाबदारी होती. तसेच तो जगभरातील संघटनेच्या वित्त पुरवठ्यापैकी मोठा भागाची जबाबदारी तो सांभाळत होता.
अबू खादीजा हा इराक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या सर्वात घातक दहशतवाद्यांपैकी एक मानला जात होता. आयसिसच्या नेत्यांच्या क्रमवारीत त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे तो एक प्रमुख व्यक्ती म्हणून समोर आला होता. संघटनेतील त्यांच्या प्रतिष्ठेमुळे ‘caliph’ म्हणजेच आयसिसचा जागतीक नेता म्हणून त्याचा विचार केला जात असल्याची चर्चा होती.