राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आयसिसशी संबंधीत चार संशयीतांना शनिवारी ताब्यात घेतले. हैदराबादमधील तीन ठिकाणी तर महाराष्ट्रातील वर्धा येथे टाकलेल्या छाप्यातून ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे एनआयएने २०१६ च्या आयसिसच्या अबुधाबी मॉड्यूलप्रकरणी चौकशीसाठी हे छापे मारले. या संशयीतांकडे तपास अधिकाऱ्यांना अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर कागदपत्रे आढळून आली आहेत. ताब्यात घेतलेल्या लोकांकडे अधिक चौकशी केली जात आहे. एका परिपत्रकाद्वारे एनआयएने ही माहिती दिली आहे.
एनआयएने परिपत्रकात म्हटले आहे की, एनआयए २०१६च्या एका प्रकरणाची चौकशी करीत आहे. यामध्ये आरोप आहे की, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीयाचे (आयसिस) सदस्य एका कथीत कटात सहभागी होते. यानुसार, या प्रतिबंधित संघटनेत सहभागी करुन घेण्यासाठी भारतीय मुस्लिम तरुणांना निवडणे, त्यांना प्रेरित करणे, कट्टरवादी बनवणे, भरती करुण घेणे आणि प्रशिक्षण देणे याचा समावेश आहे.
जानेवारी २०१६ मध्ये एनआयएने तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांना अबुधाबीवरुन दिल्लीत पोहोचल्यानंतर अटकही करण्यात आली होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये १३ मोबाईल फोन, ११ सिमकार्ड, एक आयपॅड, दोन लॅपटॉप, एक हार्डडिस्क, सहा पेन ड्राईव्ह, सहा एसडी कार्ड आणि तीन वॉकी टॉकी सेटचा समावेश आहे.
दरम्यान, एनआयएने २०१८ मध्ये आयसिसबाबत सहानुभूती दाखवल्याबद्दल मोहम्मद अब्दुल्ला बासित आणि मोहम्मद अब्दुल कादिर यांना हैदराबादेतून अटक केली होती.