प्रजासत्ताक दिनी मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी विमानतळाच्या शौचालयातील भिंतीवर ‘इसिस’च्या नावाने दिली गेली आहे. याची दखल घेत भारत सरकारने सुरक्षा यंत्रणांना कडक सूचना दिल्या असून, मुंबईसह देशातील महत्त्वाच्या विमानतळांवरील सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी १० जानेवारी रोजीसुद्धा मुंबई विमानतळाच्या शौचालयात एका पोस्टरद्वारे विमानतळ उडविण्याची धमकी देण्यात आली होती.
दरम्यान, यंदा पहिल्यांदाच भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ओबामा हे तीन दिवसांच्या दौऱयासाठी २५ जानेवारीला भारतात दाखल होणार आहेत. ओबामा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची वेळ साधून भारतात हल्ला करून दहशत माजवण्याचा दहशतवादी संघटनांचा प्रयत्न असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनाही मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरील धमकी गांभीर्याने घेऊन पोलीस यामागील सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.