इसिस हा दहशतवादी गट रोज १० लाख डॉलर्स खंडणी किंवा सक्तीच्या करापोटी गोळा करीत असून त्यांच्या मालमत्तेवर तेलाच्या ढासळत्या किमतींनी काही परिणाम होण्याची शक्यता नाही असे एका अहवालात म्हटले आहे.
लष्करी सामुग्री लुटणे, जमिनी व पायाभूत सुविधा लुटणे, जिहादींना कमी पैसे देणे या मार्गानी इसिस पैसे वाचवते असे न्यूयॉर्क टाइम्सया अमेरिकेतील वृत्तपत्राने याबाबत एका वृत्तात म्हटल्यानुसार रँड कार्पोरेशनने इसिसच्या मालमत्तेचे विश्लेषण केले आहे.
रँड कार्पोरेशन या स्वयंसेवी संस्थेच्या विश्लेषणानुसार इसिस या दहशतवादी गटाला २०१४ मध्ये १.२ अब्ज डॉलर्स मिळाले. काही देशात त्यांनी कर व खंडणीच्या रूपात ६०० दशलक्ष डॉलर्स मिळवले असून त्यांनी इराकमध्ये बँका लुटून ५०० दशलक्ष डॉलर्स मिळवले आहेत तर तेल उद्योगांच्या पायाभूत सुविधांतून त्यांना फक्त १०० दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. इसिस आता त्यांच्या कारवायांची व्यापकता वाढवत असून दहशतवादी कारवायांना बळ देत आहे. सध्याचा खर्च भागवण्यासाठी इसिसकडे भरपूर पैसे आहेत. हवाई हल्ले व तेलाच्या ढासळत्या किमती यामुळे त्यांना काहीच फटका बसलेला नाही. इसिस रोज १० लाख डॉलर्स खंडणी व कर गोळा करते. इराकी सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्यांनी ५० टक्के कर लावला आहे त्यातून त्यांना गतवर्षी ३०० दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. कंपन्यांच्या महसुलावरही २० टक्के कर इसिसने लावला आहे. बँका, तेल उद्योग हे त्यांचे इतर स्रोत आहेत.
तेलाचा महसूलच आठवडय़ाला २० लाख डॉलरने कमी झाला आहे, पण इसिस तेलाच्या पैशावर विसंबून नाही. इसिसने वेतनावर जास्त खर्च केला असून तो महिन्याला ३० लाख ते १ कोटी डॉलर्स आहे. इसिसने गेल्या महिन्यात तिक्रीत गमावले असले तरी त्यांचे इराक व सीरियात हल्ले सुरूच असून इराकचे रामदी शहर त्यांनी परत ताब्यात घेतले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा