‘इस्लामिक स्टेट ग्रुप’ म्हणजे इसिसने त्यांच्या प्रचारार्थ जारी केलेल्या वृत्तपटात मोसूल ताब्यात घेतल्याच्या घटनेचे चित्रण दाखवले आहे. इराकमधील मोसूल हे दुसरे मोठे शहर असून ते इसिसने सहज ताब्यात घेतले. या वृत्तपटात इसिसचे उदात्तीकरण करण्यात आले असून मोसूलमधील विजय व तेथे तीन आठवडय़ात खिलाफत सुरू करण्याच्या तसेच इराकी सैन्याच्या पाडावाचे चित्रण त्यात आहे.
२९ मिनिटांच्या या वृत्तपटाचे प्रसारण या आधी करण्यात आले नव्हते. मोसूलमधील आगेकूच अपेक्षेपेक्षा सहज झाली असे वर्णन या वृत्तपटात केले असून तो समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) टाकण्यात आला आहे. वाहनांचे तीन काफिले शहरात येताना त्यात दिसतात व त्या वेळी इसिसचे जवान मोठय़ा प्रमाणात होते. ९ जूनला मोसूलमध्ये जिहादी हल्ला सुरू झाला व त्यानंतर २० लाखांचे हे शहर इसिसने दुसऱ्याच दिवशी ताब्यात घेतले होते. त्यावेळी अनेक इराकी लोक शेजारच्या कुर्दीस्तानमध्ये पळून गेले. इराकी सुरक्षा दलांच्या सैन्याची कामगिरी निराशाजनक झाली. अमेरिकेने इराकच्या सैन्याला अब्जावधी डॉलर्स खर्च करून दिलेले प्रशिक्षण अशा रितीने वाया गेले होते. इसिसने नंतर बगदादमध्ये काळा झेंडा फडकावला. जिहादींना थांबवण्यासाठी अमेरिका व इराणने केलेले प्रयत्न फोल ठरले. अमेरिकेने इसिसवर ४५०० हवाई हल्ले केले पण त्यांनी या हल्ल्यांना तोंड देत लढाई चालू ठेवली. मोसूल येथे त्यांनी शस्त्रागारही लुटले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा