नभोवाणी वाहिनीला दिलेल्या वृत्तात हल्लेखोराचा अभिमान वाटत असल्याची कबुली
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्लेखोर ओमार मातीन याचा आम्हाला अभिमान असल्याचे आयसिसने अल-बयान या नभोवाणी वाहिनीला दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
फ्लोरिडा राज्यातील ओर्लँडो शहरातील एका नाइट क्लबमध्ये रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ओमार मातीन या तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार तर ५३ जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मातीन ठार झाला. ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा अमेरिकेतील सर्वात मोठा नरसंहार समजला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हा अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्लाच असल्याचे म्हटले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर आयसिसने ओर्लँडोतील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले. ‘आमच्या खिलाफतीचा शूर योद्धा ओमार मातीन याला देवानेच नाइट क्लबवर हल्ला करण्याची प्रेरणा दिली. त्याच्या या कृत्याचा आम्हाला अभिमान वाटतो’, असे या वृत्तात आयसिसने म्हटले आहे.
हल्लेखोर मातीन यानेही नाइट क्लबवरील हल्ल्यापूर्वी ‘९११’ या अमेरिकेच्या राष्ट्रीय आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकावर दूरध्वनी करून आपल्या निष्ठा आयसिसला वाहिल्या होत्या. एफबीआयनेही मातीनला यापूर्वी दोनदा अटक करून चौकशीनंतर त्याची सुटका केल्याचे स्पष्ट केले आहे. आयसिसशी असलेल्या संबंधांवरूनच त्याची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, हल्ल्यानंतर अमेरिकेवर भीतीचे सावट पसरले असून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ओमार मातीन हा मुस्लीम अमेरिकन पण अफगाणी वंशाचा होता. अमेरिकी माध्यमांनी त्याच्या नातेवाइकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात तो फार धार्मिक होता, असे कुणी सांगितले नाही पण तो त्याच्या पत्नीवर नेहमी हल्ले करीत असे. तसेच, समलिंगी संबंधांचा तो कडवा विरोधक होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
एकास अटक
इंडियाना येथील एका व्यक्तीस तीन रायफली व स्फोटके बनवण्याच्या रसायनांसह दक्षिण कॅलिफोर्नियात अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव जेम्स वेस्ले हॉवेल असे असून तो वीस वर्षांचा आहे.
हिलरींचा प्रचार स्थगित
वॉशिंग्टन- ओर्लँडो येथील हल्ल्याच्या घटनेत ५० जण ठार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या समवेतची संयुक्त प्रचार मोहीम तूर्त लांबणीवर टाकली आहे. ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला अलिकडेच पाठिंबा दिला होता. क्लिंटन यांनी ओबामा यांच्या समवेत बुधवारी विस्कॉन्सिन येथे प्रचार करण्याचे ठरवले होते. पण ओर्लँडो येथील घटनेनंतर त्यांनी हा प्रचार कार्यक्रम स्थगित केला. व्हाइट हाउसनेही तूर्त ओबामा हे क्लिंटन यांच्या प्रचारासाठी जाणार नाहीत असे सांगितले.