इराकच्या अन्बर प्रांतातील रमादी शहर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या हाती पडले असून तेथून मोठय़ा प्रमाणावर नागरिक आणि इराकी सैनिक पळून जात आहेत.
सीरिया आणि इराकच्या मोठय़ा भूभागावर ताबा मिळवत इसिसने गेल्या वर्षी संघर्ष सुरू केल्यानंतर इराकी फौजांना बसलेला हा मोठा फटका आहे. या शहरावर ताबा मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून इराकी फौजा आणि इसिसमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. त्यात गेल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक सैनिक व नागरिकांचे प्राण गेले असून रमादी शहरावर अखेर इसिसने ताबा मिळवला आहे. गेल्या काही दिवसांत तेथून ८००० हजार नागरिकांनी पलायन केले आहे. गेल्या वर्षभरात या भागात सुरू असलेल्या संघर्षांमुळे एप्रिलअखेर १,१४,००० नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, रमादी शहरात इसिसची सरशी होत असल्याचे वृत्त पसरताच आसपासच्या प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात शिया पंथाचे लढवय्ये इराकी फौजांना मदत करण्यासाठी तेथे जमा होत आहेत. इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी सैनिकांना आपले मोर्चे न सोडता लढत राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकी फौजांनी इसिसच्या सैनिकांविरुद्ध हवाई हल्ले करूनही इराकी सैनिक तग धरू शकले नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इराकचे तत्कालीन हुकूमशहा सद्दम हुसेन यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय फौजांनी २००३ साली केलेल्या कारवाईनंतर अन्बर प्रांतात प्रथमच इतका प्रखर संघर्ष होत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी मात्र रमादी येथे इराकी फौजांना माघार घ्यावी लागली असली तरी इसिसला नामोहरम करण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. फक्त त्याला प्रदीर्घ काळ लढा देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी त्यांनी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना व्यक्त केले.
इराकमधील रमादी शहरावर इसिसचा ताबा
इराकच्या अन्बर प्रांतातील रमादी शहर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या हाती पडले असून तेथून मोठय़ा प्रमाणावर नागरिक आणि इराकी सैनिक पळून जात आहेत.
First published on: 19-05-2015 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis takes control of iraqi city ramadi