‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा मृत्यू झाला आहे. एका युद्धादरम्यान, कुरेशीचा मृत्यू झाल्याची माहिती इसिस संघटनेनं जाहीर केली आहे.
वृत्तसंस्था ‘एएफपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, इसिसच्या प्रवक्त्याने सांगितलं की, आमचा नेता कुरेशी देवांच्या शत्रूंशी लढताना युद्धात मारला गेला आहे. पण कुरेशीच्या मृत्यूची नेमकी तारीख किंवा दिवस याबाबत कोणतीही माहिती इसिसकडून देण्यात आली नाही. या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने एक ऑडिओ संदेश जारी करत ही माहिती दिली असून इसिसच्या नवीन नेत्याच्या नावाची घोषणाही केली आहे.
अबू अल-हुसेन अल-हुसेनी अल-कुरेशी हा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ या गटाचा नवीन नेता असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं उत्तर सीरियातील इदलिब प्रांतात हवाई हल्ला करत इसिसचा याआधीचा नेता अबू इब्राहिम अल-कुरेशी याला ठार केलं होतं. त्याआधीचा इसिस नेता अबू बक्र अल-बगदादी हाही ऑक्टोबर २०१९ मध्ये इदलिबमध्येच मारला गेला होता.