अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ‘इस्लामिक स्टेट इन् इराक अँड सीरिया’च्या (आयसिस) अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या लष्करी मोहिमेबद्दल मनात खदखदणारा असंतोष ‘आयसिस्’ने नव्या ध्वनिचित्रफितीत व्यक्त केला आहे. ब्रिटिश पत्रकार जॉन कँटिल याची आणखी एक ध्वनिचित्रफीत जारी करताना अमेरिकेसह अन्य राष्ट्रांनी आपल्याविरोधात सुरू केलेली लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी, अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा कँटिलच्या माध्यमातून ‘आयएसआयएस’ने दिला आहे.
‘अमेरिका आणि सहकारी राष्ट्रांनी तिसरे आखाती युद्ध पुकारले आहे. व्हिएतनाम युद्धानंतर प्रथमच अशा परिस्थितीचा सामना या देशांना करावा लागत आहे. सध्या या देशांचे एकूण १५ हजारांचे सैन्य ‘आयएसआयएस’च्या ताब्यातील प्रदेशावर हल्ला करण्यासाठी आले आहे. मात्र ही संख्या हास्यास्पद वाटावे इतकी कमी आहे. यापेक्षा कैकपट अधिक मुजाहिद्दीन ‘इस्लामिक स्टेट’साठी लढत आहे. आणि हे सैन्य म्हणजे कलाश्निकॉव्ह बंदुका बाळगणारे अप्रशिक्षित, विखुरलेले मनुष्यबळ नसून अत्यंत शिस्तबद्ध आणि ध्येयासाठी झुंजणारे दल आहे,’ असा इशारा काही मिनिटांच्या या ध्वनिचित्रफितीत कँटिल याने दिला आहे.

Story img Loader