एका कुर्दी सैनिकाच्या शिरच्छेदाची नृशंस ध्वनिचित्रफीत प्रसारित करतानाच, इसिसच्या अतिरेक्यांनी ‘व्हाइट हाऊसमध्ये शिरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा शिरच्छेद करण्याची तसेच अखंड अमेरिकेला इस्लामिक राष्ट्र करण्याची’ धमकी दिली आहे. ‘बंबार्डमेंट ऑफ पिसफुल मुस्लिम्स इन् द सिटी ऑफ मोसुल’ या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफितीत हा इशारा देण्यात आला आहे.
इसिसविरोधात आक्रमक पावले उचलणाऱ्या अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम या राष्ट्रांवर तसेच कुर्दी जनतेवर हल्ला करू, असे एका बुरखाधारी अतिरेक्याने धमकावले आहे. इसिसचे समर्थक युरोपीय महासंघातील अमेरिका समर्थक देशांच्या प्रमुखांना कार बॉम्बने उडवून लावतील, अशी वल्गना या अतिरेक्याने केली आहे. विदीर्ण इमारती-शहरे, मृतदेह आणि जखमी बालकांची चित्रे या ध्वनिचित्रफितीत दाखविण्यात आली आहेत. तसेच मोसुलमधील शांततावादी मुस्लिमांवर हल्ला करणाऱ्या- त्यांच्यावर बॉम्बफेक करणाऱ्या अमेरिकेला चांगलाच धडा शिकवण्याची भाषाही त्यात केली गेली आहे.

Story img Loader