‘इस्लामिक राज्य’ संकल्पनेचे कडवे समर्थन करणारे ट्विटर खाते भारतातून चालविले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, हे खाते हाताळणारा माणूस बंगळुरू येथून हे काम करीत होता आणि या खात्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘इसिस’साठी भरती केली जात असावी, असा अंदाजही संरक्षण तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ब्रिटनस्थित चॅनेल ४ न्यूज या वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे. तसेच हे वृत्त जाहीर होताच संबंधित व्यक्तीने आपले ट्विटर खाते वापरणे थांबविल्याचेही पुढे आले आहे. @रँं्रेह्र३ल्ली२’ या नावाने ‘जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ट्विटर खाते चालविले जात होते. बंगळुरू येथून सदर खाते चालविणाऱ्या व्यक्तीने  ‘मेहदी’ या टोपणनावाचा वापर केला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचे नमूद करीत आपले नाव आणि इतर तपशील जाहीर करण्यास नकार दिला होता. ‘आजवर सदर इसमाने पडद्याआड राहणेच पसंत केले होते. इस्लामिक राज्याच्या प्रचारातील त्याची मध्यवर्ती भूमिका नेमकी काय होती आणि कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देणे तो सराईतपणे टाळत अशे’, असे चॅनेल ४ तर्फे सांगण्यात आले होते.
मात्र ‘मेहदी’ ही त्याची ओळख आणि बंगळुरू येथील एका गटासाठी तो काम करीत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या माणसाने आपल्या ट्विटर खात्यावर व्यक्त केलेल्या ट्विप्पण्यांना प्रत्येक महिन्यात २० लाख वाचक होते. फॉलोअर्सची संख्या १७,७०० पेक्षा अधिक होती. त्यामुळे हे ट्विटर खाते ‘इस्लामिक राज्य’ समर्थकांपैकी सर्वात प्रभावी खाते असल्याचे पुढे आले आहे.
शुक्रवारी सकाळी बंगळुरू पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. मात्र गुरुवारी याबाबतचे वृत्त ब्रिटनस्थित ‘चॅनेल ४’ने प्रसिद्ध करताच या खात्यावरील सर्व व्यवहार थांबविण्यात आले आहेत. याबाबत आमच्याकडेही शुक्रवारीच अहवाल आला असून, त्याची खातरजमा सध्या सुरू आहे. तसेच क्राईम ब्रँचला या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त एम. एन्. रेड्डी यांनी दिली.
प्रक्षोभकता आणि फॉलोअर्स
गतवर्षीपासून हे ट्विटरखाते सुरू होते. ‘इसिस’च्या आक्रमकतेचे दाखले देणाऱ्या ध्वनिचित्रफिती आणि मजकूर तसेच ‘इसिस’तर्फे प्रत्यक्ष युद्धभूमीवरून मिळणारे तपशीलही यावरून प्रसिद्ध करण्यात येत होते. ‘इसिस’साठी लढायला जाणाऱ्या आणि तेथून परतणाऱ्या ‘ब्रिटिश वंशाच्या जिहादींशी’ आपण नियमित संपर्कात असल्याचा दावाही खातेवापरकर्त्यांने केला आहे. तसेच ही माहिती आपल्या मोबाइलवरून टाकण्यात आली असल्याचा दावाही ‘चॅनेल ४’ने केला आहे.