Lawyer in Bangladesh files writ petition in High Court seeking ban on Iskcon : बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे हिंदू पुजारी आणि इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका येथे अटक करण्यात आली. या अटकेविरोधात तसेच कट्टरपंथी इस्लामिक संघटनांनी इस्कॉन आणि इतर हिंदू मंदिरांना लक्ष्य केल्याबद्दल बांगलादेशमध्ये जोरदार निदर्शने केली जात आहेत. यादरम्यान आता बांगलादेश सरकारने इस्कॉन ही एक ‘धार्मिक कट्टरपंथी संघटना’ असल्याचे म्हटले आहे. इस्कॉनवर बंदी घालण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका रिट याचिकेला उत्तर देताना बांगलादेश सरकारने असा उल्लेख केला आहे.
एका वकिलाने बुधवारी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल दाखल केली आहे. तसेच त्याने चिन्मय कृष्ण दास यांना जामीन नाकारल्यानंतर, त्यांचे समर्थक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये सहाय्यक सरकारी वकील सैफुल इस्लाम यांचा मृत्यू झाल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून ॲटर्नी जनरल यांना इस्कॉनच्या बांगलादेशातील स्थापनेबद्दल विचारणा करण्यात आली. याला उत्तर देताना ॲटर्नी जनरल मोहम्मद असदुझ्झमन म्हणाले की, “ही संघटना राजकीय संघटना नाही, ती एक धार्मिक कट्टरपंथी संघटना आहे. सरकारकडून आधीच त्यांची चौकशी सुरू आहे”.
उच्च न्यायालयाने यावर ॲटर्नी जनरल यांना इस्कॉनबद्दल सरकारची भूमिका आणि एकूण देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती् याबद्दल गुरूवारी सकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काही आठवड्यांपूर्वी ॲटर्नी जनरल यांनी देशातील ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम असल्याने देशाच्या संविधानातून ‘सेक्यूलर’ हा शब्द वगळण्याचा सल्ला दिला होता.
हेही वाचा>> बांगलादेश पोलिसांनी दहशतवादी म्हणत ताब्यात घेतलेले इस्कॉनचे चिन्मय कृष्णा दास कोण आहेत?
या याचिकेवर इस्कॉनचे उपाध्यक्ष राधा रमन दास यांनी जगभरातील नेत्यांनी या मुद्द्यावर चर्चा करावी अशी विनंती केली आहे. तसेच त्यांनी २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली.
इंडिया टुडेशी बोलताना ते म्हणाले की , “परिस्थिती सध्या हाताबाहेर आहे. ती सध्या आमच्या नियंत्रणात नाही. नंतर परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे”. त्यांनी पुढे बोलताना ॲटर्नी जनरलने इस्कॉनला कट्टरपंथी संघटना संबोधल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, “बांगलादेशमधील पुराच्या वेळी आम्ही अनेक लोकांची सेवा केली. आम्ही हे का करतोय असे आम्हाला विचारले गेले, तरीही आम्ही ते काम केले. इस्कॉनने जगभरातील आठ अब्ज लोकांचे पोट भरले आहे आणि आम्हाला कट्टरपंथी दहशतवादी संघटना ठरवले जात आहे?”.
बांगलादेशमध्ये नेमकं काय झालं?
चिन्मय दास यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यांच्यावर हिंदू समाजाच्या आंदोलनादरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांच्या अटकेनंतर हिंदू धर्मियांकडून निषेध व्यक्त करत आंदोलने करण्यात येत आहेत.