काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ऑस्ट्रेलियन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती मंदिरांची तोडफोड झाली नसती, असं ते म्हणाले. एएनआयवृत्त संस्थेला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ऑस्ट्रेलियात तिसऱ्या हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर भारतविरोधी मजकूर
ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांचं नुकसान करण्यात आले आहे. ऑस्टेलियन पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती, तर अशा घटना घडल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, काल मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथे असलेल्या हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. यावेळी मंदिराच्या भींतीवर खालिस्तानी समर्थकांनी भारताविरोधी मजकूर देखील लिहिला होता. यापूर्वी १७ जानेवारी रोजी मेलबर्नमधीलच बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, मागच्या १५ दिवसातला हा तिसरा हल्ला आहे.