सर्व धर्माचे खरे घर इस्लाम हेच आहे. त्यामुळे इतर धर्मातील लोक इस्लामचा स्वीकार करतील तीच खरी घरवापसी असेल, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
लहानपणी प्रत्येक जण मुस्लीम म्हणूनच जन्माला येते, मात्र त्याचे पालक त्यांचे धर्मातर करतात, असा शोध त्यांनी हैदराबाद येथील सभेत लावला. संघ परिवार घरवापसीच्या नावाखाली मोहीम राबवीत असून मुस्लिमांना पाच लाख तर ख्रिश्चनांना धर्मातरासाठी दोन लाख रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जगातील सगळी संपत्ती तुम्ही दिलीत तरी मुस्लीम आपला धर्म सोडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. इतरांनी इस्लाम स्वीकारावा, असे आवाहन करतानाच त्यात सक्ती नाही, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले. तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही पण जगात यशस्वी होण्याची हमी देतो, असा दावा केला. भारत ही आमच्या पूर्वजांचा देश आहे, असा युक्तिवाद करीत, अ‍ॅडमला आपण साऱ्या मानवतेचा पिता मानतो, तो पृथ्वीवर अवतरला तेव्हा भारतातच आल्याचे त्यांनी सांगितले. घरवापसी मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल ओवेसी यांनी टीकास्त्र सोडले. अशा घटनांनी देशाचे काय होईल याचा विचार तुम्ही केला आहे काय, असा सवाल केला. देशात परकीय चलन कसे येणार? थेट परकीय गुंतवणुकीचे काय, असे प्रश्न विचारले.

..तर सरकारला पाठिंबा
पाकिस्तानचा दहशतवादी जखिऊर रेहमान लखवी तसेच हफीज सईद या दोघांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली. देशाचे शत्रू हे मुस्लिमांचे शत्रू आहेत असे स्पष्ट केले. भाजपशी एमआयएमचे मतभेद असले तरी देशाच्या शत्रूंविरोधात कोणत्याही कारवाईस आमचा पाठिंबा आहे, ही भूमिका संसदेतही मांडल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

Story img Loader