दारुल उलूम देवबंदने दाढी केलेल्या चार विद्यार्थ्यांची हकालपट्टी केली आहे. ६ फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर या ठिकाणी असलेली इस्लामी शिक्षण संस्था दारुल उलूम देवबंदने एक आदेश जारी करत विद्यार्थ्यांनी दाढी काढू नये असं सांगण्यात आलं आहे. दारुल उलूम देवबंद या संस्थेतील शिक्षण विभागाचे प्रभारी मौलाना हुसैन अहमद यांनी सोमवारी संध्याकाळी एक आदेश जारी केला आहे. या आदेशात हे स्पष्ट करण्यात आलं आहे की जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे.
काय आहे आदेशात?
जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे जो विद्यार्थी दाढी काढून प्रवेश घ्यायला येईल त्याला प्रवेश दिला जाणार नाही, असं मौलाना हुसेन अहमद यांनी आदेशात म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार दारुल उलूम देवबंदने तीन वर्षांपूर्वी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्यासाठी एक फतवाच काढला होता. यामध्ये हे नमूद करण्यात आलं होतं की दाढी काढणं हे इस्लाममध्ये हराम मानलं गेलं आहे.
दारुल उलूम देवबंदने विद्यार्थ्यांसाठी हा नवा नियम लागू केला आहे. त्यामध्ये हे स्पष्ट लिहिण्यात आलं आहे की जे विद्यार्थी दाढी काढतील त्यांची हकालपट्टी करण्यात येईल. दाढी काढलेल्या चार विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.
मौलाना खालिद रशीद फरंगी यांनी काय म्हटलं आहे?
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य आणि लखनऊचे काजी मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी म्हटलं आहे रसूल अल्लाह मोहम्मद साहेब दाढी ठेवत असत. त्यामुळे इस्लाममध्ये दाढी ठेवणं ही सुन्नत मानली जाते. दाढीचं इस्लाममध्ये खूप महत्त्व आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.