इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने अमेरिकेत पुन्हा एकदा ९/११ हल्ल्याची पुनरावृत्ती घडविणार असल्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ ९ ११ हल्ल्याच्या १४ व्या स्मृतीदिनी व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये ‘इसिस’ने अमेरिकेत प्रवेश केल्याचा दावा केला असून अमेरिकेला ९/११ हल्ल्याची पुन्हा एकदा आठवण होईल, असा हल्ला करण्याची पूर्ण तयारी केल्याचा दावा ‘इसिस’ने केला आहे. आत्मघातकी हल्लेखोर स्फोटकांनी भरलेली कार घेऊन अमेरिकेत हल्ले करणार असल्याचेही व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
२००१ साली अल-कायदाच्या १९ दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती आपल्या ठरलेल्या लक्ष्यांच्या दिशेने वळवली होती. त्यातील दोन विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन मनोऱ्यांवर आदळली. तिसरे अमेरिकी संरक्षण दलाचे मुख्यालय असलेल्या व्हर्जिनियातील पेंटॅगॉन या इमारतीजवळ कोसळले, तर चौथ्या विमानाचे लक्ष्य वॉशिंग्टन डीसी होते. मात्र ते तेथून पेनसिल्व्हानिया राज्यात कोसळले. या हल्ल्यांत एकूण २,९९६ जणांचा बळी गेला, तर सुमारे १० अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.