इस्रायलच्या हवाई दलाने गाझा पट्टीत दहशतवाद्यांविरोधात नव्याने सुरू केलेल्या लष्करी कारवाईत गुरुवारी तीन पॅलेस्टिनी ठार झाले. गाझा पट्टीत इस्रायल आणि इजिप्तमधील वाद कमालीचा चिघळला असून इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत ठार झालेल्यांची संख्या ११ झाली असून सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर अहमद जब्बारी हादेखील ठार झाला आहे. इस्रायल आणि गाझा पट्टीतील दहशतवादी गटांमध्ये चकमक उडाल्यानंतर इस्राएलने हे हवाई हल्ले तीव्र केले आहेत.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेत असल्याची दृश्ये बुधवारी हमासच्या अल अक्सा वाहिनीवरून दाखवण्यात येत होती. हवाई हल्ल्यानंतर नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने सैरावैरा धावतानाही दिसत असल्याचे अल अक्सा वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात दोन लहान मुलांसह पाच जण मारले गेल्याची माहिती हमासचे आरोग्यमंत्री मुफीद मुखललाटी यांनी गाझा शहरातील शिफा रुग्णालयात पत्रकार परिषदेत दिली. इस्रायलने बुधवारपासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यानंतर गाझा पट्टीतील रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, इस्राएलच्या गाझा पट्टीवरील हवाई हल्ल्यानंतर इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोरसी यांनी इस्रायलमधील आपल्या राजदूताला माघारी बोलावले आहे.
ओबामांची इस्रायल , इजिप्तच्या नेत्यांशी चर्चा
गाझा पट्टीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्राएल आणि इजिप्तला सबुरीचा सल्ला दिला आहे. गाझा पट्टीतून बंडखोरांनी इस्राएलच्या दिशेने रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्रायलने स्वसंरक्षणार्थ केलेल्या हवाई हल्ल्याचे बराक ओबामा यांनी समर्थन केले आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी निरपराध नागरिकांचा बळी जाऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही ओबामा यांनी केल्याचे व्हाइट हाऊसमधून बुधवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ओबामांनी इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोरसी यांच्याशीदेखील चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन केले. गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने झालेल्या रॉकेट हल्ल्याचा निषेध करून इस्रायलला आपल्या संरक्षणार्थ कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे ओबामा यांनी मोरसी यांना सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांचे आवाहन
गाझा पट्टीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसघटनेचे महासचिव बान कि मून यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून रक्तपात थांबवावा, अशी विनंती केली. इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा लष्करी कमांडर झाल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर मून यांनी इस्राएल आणि इजिप्तच्या नेत्यांशी चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला असून दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या हिंसाचारात निरपराध्यांचे बळी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
इस्रायलकडून होणाऱ्या हवाई हल्ल्याची निंदा करीत या प्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी इजिप्तने केली आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तच्या नेतृत्वाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांनी जोरदार पाठिंबा दर्शवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा