इस्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप चालू आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी इस्रायलने जंगजंग पछाडलं आहे. शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री इस्रायलच्या वायूदलाने गाझामधल्या दोन घरांवर हवाई हल्ला केला. यामध्ये एकाच कुटुंबातील ७६ सदस्यांसह एकूण ९० पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. मदत आणि बचाव पथकांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधीच संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की गाझामधील कोणतीही जागा सुरक्षित नाही. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे तिथे मानवतावादी मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत.
इस्रायली सैन्याने शनिवारी सांगितलं की, गेल्या आठवड्यात त्यांनी शेकडो कथित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी २०० हून अधिक दहशतवाद्यांची चौकशी चालू आहे. हमास आणि इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांशी संबंधित ७०० हून अधिक लोक इस्रायलच्या तुरुंगांमध्ये कैद आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री इस्रायलने गाजामधील दोन घरं भुईसपाट केली. यापैकी एक घर गाझा शहरात तर दुसरं नुसरत भागात होतं. गाझाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते महमूद बासल यांनी सांगितलं की, गाझा शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात अल-मुगराबी कुटुंबातील ७६ सदस्य मारले गेले आहेत. बासल यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांची यादीदेखील जारी केली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त असल्याचं बासल यानी सांगितलं.
या हल्ल्यापाठोपाठ नुसरत परिसरात स्थानिक पत्रकार मोहम्मद खलिफा यांच्या घरावर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खलिफा यांच्यासह इतर १४ जण मारले गेले. जवळच्या अल-अक्सा रुग्णालयाने या हल्ल्याची आणि मृतांबाबतची माहिती दिली आहे.
इस्रायलने गाझामधील हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे तिथले हजारो लोक घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत. आतापर्यंत या युद्धात गाझामधील लोकसंख्येच्या एक टक्का लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर गाझातल्या २३ लाख लोकांपैकी ८५ टक्के लोकांना सुरक्षित ठिकाणी शरण घ्यावी लागली आहे.