Israel Syria War : इस्रायली वायूदलाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) रात्री सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये व या शहराच्या दक्षिणेकडील भागात हवाई हल्ले केले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राजधानी व आसपासच्या भागात स्फोटांचे आवाज येत होते. दुसऱ्या बाजूला इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी या हवाई हल्ल्याची (एअर स्ट्राईक) पुष्टी केली आहे. काट्ज म्हणाले, “सीरियातील दहशतवादी संघटनाकंडून दक्षिण सीरियामध्ये इस्रायली सैन्याविरोधात कारवाया चालू होत्या. त्या रोखण्यासाठी व बफर झोनचं उल्लंघन थांबवण्यासाठी आम्हाला हा हवाई हल्ला करावा लागाला”.

पाठोपाठ इस्रायली सैन्याने देखील या हवाई हल्ल्याची माहिती दिली आहे. आयडीएफने (इस्रायली डिफेन्स फोर्सेस) म्हटलं आहे की “दक्षिण सीरियामध्ये काही सैन्य तळांवर आम्ही हल्ला केला आहे. यामध्ये कमांडर सेंटर व शस्त्रसाठा ठेवलेल्या काही जागांचा समावेश आहे. दक्षिण सीरियात लष्करी बळ वाढवण्यात आलं आहे. तसेच येथे काही दहशतवादी संघटना ठाण मांडून बसल्या होत्या. याचा इस्रायलला धोका होता. हा धोका दूर करण्यासाठी आम्हाला आक्रमक पाऊल उचलावं लागलं”.

दोन जण ठार

सीरिया टीव्हीने या हल्ल्याचं वृत्त जारी करताना म्हटलं आहे की इस्रायली विमानांनी दमास्कसपासून २० किलोमीटर दूर दक्षिण किस्वाह शहरावर हल्ला केला. यावेळी एका लष्करी तळावरही हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जण ठार झाले आहेत. जखमींची संख्या अद्याप समोर आलेली नाही. हस्रायली वायूदलाने दमास्कसच्या आसपासच्या भागात लष्करी वाहनांना लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यात मोठी वित्तहानी झाली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आधीच इशारा दिला होता

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच म्हटलं होतं की “दक्षिण सीरियामध्ये एचटीएस किंवा इस्रायलविरोधात तयार होत असलेली कोणतीही शक्ती आम्ही टिकू देणार नाही. इस्रायलविरोधातील कारवाया थांबवण्याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देऊ. या भागात लष्करी तळ उभारू नयेत, अशी आमची मागणी आहे”.

Story img Loader