Israel Ambassador condemns Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पहलगामचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. दरम्यान इस्रायलने या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून भारताला पाठिंबा दर्शविला आहे.
भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटले की, हा अतिशय भ्याड हल्ला होता. दहशतवादी नेहमीच लोकांना दहशतीखाली आणण्यासाठी नवे नवे मार्ग शोधत असतात. दहशतवादी कोणत्या पद्धतीने विचार करतात आणि अतिरेकी कृत्य कसे करतात, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. या परिस्थितीचा सामना कसा करायचा आहे? हे भारत सरकार नक्कीच ठरवेल.
रुवेन अझर पुढे म्हणाले, मला विश्वास आहे की, आपण या अधिक दृढपणे या परिस्थितीचा सामना करू. भारत सरकार आपल्यापरिने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेच. त्याशिवाय आम्हीही भारताला हरएक प्रकारची मदत करू.
राजदूत रुवेन अझर पुढे म्हणाले, भारताशी इस्रायलचा सामरिक, तंत्रज्ञान आणि गुप्तचर सहकार्याचा करार आहेच. भारताबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध स्तरांवर एकत्र येऊन काम करत आहोत. भविष्यातही असेच काम सुरू राहिल.
अझर यांची प्रतिक्रिया येण्याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे मला दुःख झाले. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत इस्रायल भारताच्या बरोबरीने उभा आहे.
इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्रायलने याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. हमासच्या हल्ल्यात दीड हजार इस्रायली नागरिकांचा बळी गेला होता. तर २५० नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. मागच्या दोन वर्षांहून अधिक काळ इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असून यात ५२ हजार लोक मारले गेले आहेत. यापैकी ५०,८१० लोक पॅलेस्टाईनचे आहेत.
इस्रायलने ज्याप्रकारे गाझापट्टीत घुसून हमासचा बंदोबस्त केला. त्याचप्रमाणे भारतानेही प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.