गेल्या १० दिवसांपासून इस्रायल व हमास यांच्यात युद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे. आधी गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या भूमीवर रॉकेट हल्ला चढवला. शेकडो रॉकेट्स इस्रायलच्या भूमीवर येऊन कोसळले. त्यापाठोपाठ हे दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले व त्यांनी सामान्य नागरिकांवर अमानुष अत्याचार करायला सुरुवात केली. यावर इस्रायलनंही सडेतोड उत्तर देत गाझामधील हमासच्या तळांवर हवाई हल्ला चढवला. इस्रायलनं युद्धाची घोषणा केली असून हमासला संपवल्याशिवाय थांबणार नसल्याचं जाहीरही केलं आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राजनैतिक अधिकारी गिलॅड एर्डन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत संताप व्यक्त केला असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
काय घडतंय इस्रायल-हमास युद्धात?
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर अत्याचार करण्याचं सत्र चालूच ठेवलं असून असंख्य नागरिक ओलीस ठेवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ इस्रायलनं हमासच्या दहशतवाद्यांना देशाच्या भूमीतून हाकलून लावण्यासाठी मोहीम उघडली आहे. गाझामध्ये इस्रायलचं सैन्य घुसलं असून सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना दक्षिण गाझामध्ये स्थलांतरीत होण्याचं आवाहन इस्रायल सरकारनं केलं आहे. त्यामुळे युद्ध चिघळल्याचं सध्या दिसत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायलला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत असल्याचं दिसत आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मध्यस्थीनंतर इस्रायलनं जॉर्डनच्या सीमेवरून गाझा पट्टीत अन्न-पाणी व इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यास होकार दिला आहे. त्यामुळे हा काही अंशी गाझामधील नागरिकांना दिलासा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सभेतलं भाषण चर्चेत आलं आहे.
Israel-Hamas War : बायडेनपाठोपाठ यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल; म्हणाले, “हे राष्ट्र…”
काय म्हणाले गिलॅड एर्डन?
गिलॅड एर्डन यांनी संयुक्त राष्ट्राचे सदस्य असणारे काही देश हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या विरोधात असल्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “इथे काय चाललंय? मला खरंच धक्का बसला आहे. मला खरंच काही कळत नाहीये. ११ दिवसांपूर्वी इस्रायलवर गेल्या कित्येक दशकांमधला सर्वाधिक नृशंस हल्ला करण्यात आला. तो अमेरिकेवरील ९/११ पेक्षाही मोठा होता. पण इथे असं दिसतंय की या परिषदेला त्या हल्ल्याचा विसर पडला आहे. ७ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या त्या भीषण हल्ल्याचे व्हिडीओ माझ्यासह प्रत्येक इस्रायली नागरिकाच्या मनात कायमचे घर करून गेले आहेत. पण असं वाटतंय की तुमच्यापैकी काहींना मला तेव्हा नेमकं काय घडलं होतं याची आठवण करून द्यावी लागेल”, असं गिलॅड एर्डन यावेळी म्हणाले.
“अनेक मातांच्या समोर त्यांच्या चिमुरड्यांची हत्या झाली”
“हमासचे हजारो रानटी दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी जवळपास १४०० निर्दोष इस्रायली नागरिकांची कत्तल केली. काहींवर बलात्कार झाला, काहींची डोकं धडापासून वेगळं करण्यात आलं तर काहींना जिवंत जाळण्यात आलं. त्यातले अनेक लहान मुलं होते. शेकडो तरुण होते. अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जखमींवर उपचारांसाठी जात असतानाच मारून टाकण्यात आलं. असंख्य मातांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या चिमुरडयांची हत्या करण्यात आली. हे सर्व नियोजित होतं. गाझावर सत्ता चालवणाऱ्या दहशतवाद्यांनी ठरवून हे सगळं घडवून आणलं. आज आपण बोलत असतानाही ठरवून २०० निर्दोष व्यक्तींना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. त्यातले अनेक तुमच्या देशांचे रहिवासीही आहेत”, असंही गिलॅड एर्डन यावेळी म्हणाले.
“इथे काही सदस्य आहेत, ज्यांना…”
“जर हमासला असं पुन्हा करण्याची संधी मिळाली, तर ते नक्कीच तसं करतील. तुम्हाला हे माहिती आहे. इथे काही आहेत ज्यांना काही राजकीय कारणांमुळे हमास ही दहशतवादी संघटना वाटत नाही. पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. हमासनं जाणूनबुजून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं. लहान मुलांची हत्या केली. यामुळे हमास ही आयसिसप्रमाणेच एक दहशतवादी संघटना ठरते. त्यांचा चर्चा करण्यावर विश्वास नाही. त्यांना चर्चा नकोय. राजकीय तोडगाही नकोय. त्यांचा फक्त ज्यूंचा खात्मा करण्यावर आणि ज्यू देशाचं अस्तित्व नष्ट करण्यावर विश्वास आहे. त्यांची ही विचारसरणी कुणीही बदलू शकणार नाही”, अशा शब्दांत गिलॅड एर्डन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.