वृत्तसंस्था, तेल अवीव्ह
लेबनॉनमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी केल्याचे संकेत इस्रायलच्या लष्कर प्रमुखांनी बुधवारी दिले. उत्तरेच्या सीमेवरील सैन्याला संबोधित करताना लष्कर प्रमुख हर्झी हेलेवी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इस्रायल आणि हेजबोला गटाच्या संघर्षाला बुधवारी नवे वळण मिळाले. हेजबोला गटाने कादर-१ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिशेने डागले. परंतु इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने या क्षेपणास्त्राल भेदून हेजबोलावर प्रतिहल्ला केला. या हल्ल्यामुळे हेजबोलाबरोबरील संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, लेबनॉनमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि हेजबोलाला लक्ष्य करण्यासाठीच हवाई हल्ले केले जात आहेत. उत्तर इस्रायलमधील विस्थापित नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी आम्ही डावपेच आखत असल्याचे सैन्याला संबोधित करताना लष्कर प्रमुख हर्झी हेलेवी यांनी सांगितले. तत्पूर्वी हेजबोलाने ‘मोसाद’ या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचा दावा केला. मात्र, इस्रायलने तो फेटाळून लावला आहे.
हेही वाचा >>>कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह प्रकरणी पुन्हा नवी तारीख; ३० सप्टेंबर रोजी होणार पुढील सुनावणी
हेजबोलाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले. त्यामुळे तेल अवीव्ह शहरासह पूर्ण मध्य इस्रायलमध्ये धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजू लागले. त्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने या क्षेपणास्त्राला भेदले. तसेच, हे क्षेपणास्त्र ज्या ठिकाणाहून सोडले होते, ते ठिकाणही उद्ध्वस्त केले. इस्रायलनेही हेजबोला गटाला लक्ष्य करताना प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात हेजबोला गटाचे किमान तीन जण मृत्युमुखी पडले आहेत.
इस्रायलने दावा फेटाळला
‘मोसाद’चे मुख्यालय लक्ष्य केल्याचा हेजबोलाचा दावा इस्रायलने फेटाळला. मात्र, हेजबोलाने डागलेल्या क्षेपणास्त्रात मोठा दारुगोळा होता, अशी माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली.