Israel Bombings on Gaza Killed UN Worker: इस्रायलकडून गेल्या दोन दिवसांपासून अचाकन गाझा पट्टीत सुरू करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त होऊ लागली आहे. महिन्याभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इस्रायल व हमास यांच्यातील लढ्यावर तात्पुरती युद्धबंदी लागली होती. युद्धबंदीचा पहिला टप्पाही यशस्वीरीत्या पूर्ण झाला होता. पण आता इस्रायलच्या या आगळिकीमुळे पुन्हा एकदा गाझा पट्टी अशांत झाली असून त्याचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत.

बुधवारी गाझा पट्टीत झालेल्या बॉम्ब हल्ल्यात संयुक्त राष्ट्रासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. त्याशिवाय इतर पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यामुळे आता थेट इस्रायलयच्या हेतूविषयीच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आपण संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर बॉम्बहल्ला केला नसल्याची भूमिका इस्रायलने घेतली आहे. मात्र, तरीदेखील हे हल्ले इस्रायलनेच केल्याचा दावा गाझा प्रशासन व हमासकडून करण्यात आला आहे.

गाझाच्या आरोग्य विभागाचं निवेदन

गाझा पट्टीतील हमास शासनाच्या आरोग्य विभागानं यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. “संयुक्त राष्ट्रासाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा या बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अल अक्सा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”, अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

इस्रायलकडून हल्ल्याचा आरोप फेटाळला

दरम्यान, इस्रायलयनं मात्र असा कोणताही बॉम्ब हल्ला संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर केला नसल्याचा दावा केला आहे. “ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे त्याच्या उलट स्थिती प्रत्यक्षात आहे. IDF ने (इस्रायल लष्कर) डेर अल बलाहमधील संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर बॉम्बहल्ला केलेला नाही. या भागात आयडीएफची कोणतीही कारवाई झालेली नाही”, असं आयडीएफच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

इस्रायलकडून भीषण बॉम्बवर्षाव, ४०० ठार

सोमवारपासून इस्रायलकडून महिन्याभराच्या शस्त्रसंधीनंतर पुन्हा एकदा गाझा पट्टीत बॉम्बहल्ले सुरू केले आहेत. सोमवार ते गुरुवार या चार दिवसांमध्ये इस्रायलनं केलेल्या हवाई बॉम्ब हल्ल्यात आत्तापर्यंत सुमारे ४०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं गाझा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं इस्रायलच्या सीमारेषेत हल्ले केले होते. तेव्हापासूनचा हा सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावा गाझा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

गाझा प्रशासनाकडून या युद्धात आत्तापर्यंत मारल्या गेलेल्या व्यक्तींची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यानुसार, आत्तापर्यंत गाझापट्टीत झालेल्या युद्धात तब्बल ४९ हजार ५४७ बळी गेले आहेत!

Story img Loader