Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचलंय. हमासविरोधातील रणनीती मागे घेण्यास इस्रायलने नकार दिलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू आहे. तर, गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयात इस्रायलने थेट हल्ला चढवला आहे. इस्रायल सैन्याने अल शिफा रुग्णालयात Targeted Operation ला सुरुवात केली आहे. रुग्णालयाखाली असलेले कमांड सेंटर ओलिसांना लपवण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप इस्रायलकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ ऑक्टोबर रोजी हमासने हजारो क्षेपणास्रे डागून हल्ला केल्यानंतर इस्रायल लष्कराकडून हवाई हल्ले सुरू करण्यात आले होते. कालांतराने त्यांनी जमिनीवरील कारवाईलाही सुरुवात केली. गाझा पट्टीतील अनेक निर्वासित छावण्यांवर त्यांनी हल्ले चढवले. तर, आता विस्थापितांसाठी आश्रयस्थान असलेल्या अल शिफा या सर्वांत मोठ्या रुग्णालयालाही इस्रायलने लक्ष्य केलं आहे. या रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरातही गेल्या अनेक दिवसांपासून नरसंहार सुरू आहे. दरम्यान, आज रुग्णालयात थेट प्रवेश करण्यात आला आहे.

अल शिफा रुग्णालयात लपून राहिलेल्या हमासच्या अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन इस्रायल सैन्याकडून कण्यात आले होते. परंतु, अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केले नाही. परिणामी इस्रायली सैन्याने रुग्णालयात प्रवेश केला. या रुग्णालयात युद्धात बाधित झालेले आणि विस्थापित नागरिक आश्रय घेत आहेत. तसंच, अनेक गरोदर माता आणि नवजात बालकेही उपचार घेत आहेत. परिणामी इस्रायलच्या या हल्ल्यामुळे या सर्वांचा जीव धोक्यात आला आहे.

दरम्यान, या रुग्णालयात रुग्ण, कर्माचारी आणि विस्थापित नागरिकांची संख्या २३०० हून अधिक आहे. जनरेटरमधील ऊर्जा आणि इंधन संपल्याने तीन बाळांचा अकाली मृत्यूही झाला आहे. तर, रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात मृतदेहांचा ढिग पडला असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. दरम्यान, अल शिफा रुग्णालयात कब्जा मिळवल्यानंतर इस्रायली लष्कराकडून इनक्युबेटर, लहान बाळांचे अन्न आणि वैद्यकीय पुरवठा पुरवले असल्याची माहिती इस्रायलने दिली आहे.

“आम्ही सुरुवात करत आहोत आणि आवश्यकतेनुसार ऑपरेशनचा विस्तार केला जाईल”, असे एका अधिकाऱ्याने आर्मी रेडिओला सांगितले. दरम्यान, गाझामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पॅलेस्टाईन नागरिकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. तर, रुग्णालयातील हल्ल्याला इस्रायल सैन्य आणि अमेरिका जबाबदार असल्याचं हमासने म्हटलं आहे.

एन्क्लेव्हच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्याभरात इस्रायली हल्ल्यांमध्ये ११ हजारांहून अधिक गाझा नागरिक मारले गेले आहेत. त्यापैकी सुमारे ४० टक्के मुले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या अचानक हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली मारले गेले आणि २४० हून अधिक लोकांना अतिरेकी गटाने ओलिस बनवले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel begins targeted operation direct enter to al shifa hospital what will happen to the newborns the migrants sgk