इस्रायल आणि हमासमधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इस्रायलच्या सैन्याने (इस्रायल डिफेन्स फोर्स -आयडीएफ) बुधवारी (११ ऑक्टोबर) गाझात हमासच्या सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरासह २०० ठिकाणी बॉम्बचा वर्षावर केला. एएनआय वृत्तसंस्थेने द टाईम्स ऑफ इस्रायलच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, इस्रायलावरील हल्ल्यात हमास सैन्य प्रमुख मोहम्मद डेईफची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे इस्रायलने थेट त्याच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला केला.
इस्रायलने तिसऱ्यांदा गाझातील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या ४५० ठिकाणांवर हल्ले केल्याचं इस्रायलच्या सैन्याने सांगितलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये इस्रायल सैन्याने म्हटलं, “इस्रायल सैन्य सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. अल फुरकान भागात लढाऊ विमानांनी २०० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. ४५० ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर इस्राय सैन्याने केलेला हा तिसरा हल्ला आहे.”
“आतापर्यंत इस्रायलमधील १००० जणांचा मृत्यू”
दरम्यान, हमास आणि इस्रायल युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १००० जणांचा मृत्यू झाला, २ हजार ८०० हून अधिक जण जखमी झाले. याशिवाय जवळपास ५० जण बेपत्ता असून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय आहे.
“हल्ल्यात पॅलेस्टिनमधील ७७० जणांचा मृत्यू”
दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनमधील ७७० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. मृतांमध्ये १४० लहान मुलांचा आणि १२० महिलांचा समावेश आहे.