Israel Strike On Hezbollah Lebanon: लेबनानमधील अतिरेकी संघटना हेजबोलाने इस्रायलवर ड्रोन हल्ला केला. इस्रायलच्या सैनिकी तळांवर हेजबोलाने क्षेपणास्त्र डागले. यानंतर इस्रायलनेही या हल्ल्याला तीव्र प्रत्युत्तर देत लेबनानवर हल्ला चढविला आहे. इस्रायलच्या लष्कराने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या हल्ल्याची माहिती दिली असून स्वसंरक्षणार्थ आम्ही हल्ला केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच लेबनानने आधी आमच्यावर १०० हून अधिक क्षेपणास्त्र डागले असा आरोपही इस्रायलने केला. मागच्या महिन्यात इस्रायल व्याप्त गोलान हाइट्सवर हेजबोलाने हल्ला केल्यामुळे १२ लोक ठार झाले होते. त्यानंतर इस्रायल आणि हेजबोला यांच्यात संघर्ष पेटला होता.

इस्रायलच्या लष्करी दलाने सांगतिले की, लेबनानची अतिरेकी संघटना हेजबोलाने आमच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. याची माहिती मिळताच आम्ही स्व संरक्षणासाठी लेबनानच्या अतिरेकी स्थळावर हल्ला केला.

हे वाचा >> Israel Strikes विश्लेषण : पश्चिम आशियात आता इस्रायल-हेजबोला संघर्ष? दोन आघाड्यांवर लढणे इस्रायलला शक्य होईल?

इस्रायल लष्कराने सध्या लेबनानच्या दक्षिणेकडील भागाला लक्ष्य केले आहे. पण जर इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर लेबनानच्या इतर भागांवर एअर स्ट्राइक करू असा इशारा इस्रायलच्या लष्कराने दिला आहे. दरम्यान हेजबोलाने सांगितले की, आम्ही ३२० रॉकेट इस्रायलवर डागली आहेत. तसेच ११ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. मागच्या महिन्यात बेरुत येथे हेजबोलाच्या कमांडरची हत्या करण्यात आली होती. या हत्येला प्रत्युत्तर देण्यासाठी सदर हल्ला केल्याचे हेजबोलाच्या वतीने सांगतिले गेले.

हे ही वाचा >> अग्रलेख : नेतान्याहूंची नाकेबंदी

आम्हाला डिवचणाऱ्यांना धडा शिकवू – नेत्यानाहू

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलन्ट यांनी पुढच्या ४८ तासांसाठी इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. दरम्यान पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी उत्तरेकडे उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. टाइम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार नेत्यानाहू म्हणाले, “आमच्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही उत्तरेकडील आमच्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचा निर्धार केला आहे. जो आम्हाला डिवचतो, त्याला आम्ही धडा शिकवतो, हे तत्व आम्ही आजवर पाळत आलो आहोत.”