Israel Attack on Hamas Update in Marathi : इस्रायलने आपल्या शेजारील शत्रू राष्ट्रांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. तसंच, पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासलाही लक्ष्य केलं आहे. एकाच वेळी इराण, लेबनॉन आणि हमासवर हल्ले करत असताना अनेकांचा मृत्यू होतोय. हेझबोलाचा प्रमुख हसन नसराल्लाहचा खात्मा केल्यानंतर आता हमासच्या तिघांनाही ठार केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. इस्रायल संरक्षण दलाने गुरुवारी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना गाझाच्या हमास सरकारचे प्रमुख रावी मुश्ताहा यांच्यासह तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा दावा केला.

इस्रायली लष्कराने आज गुरुवारी एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी IDF आणि ISA यांनी गाझामध्ये हल्ला करून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गाझा सरकारचे प्रमुख राव्ही मुश्ताहा, हमासच्या पॉलिटिकल ब्युरोमध्ये सिक्युरिटी पोर्टफोलिओ सांभाळणारा आणि हमास लेबर कमिटीचा सदस्य समेह अल सिराज आणि हमासचा जनरल सिक्युरिटी मेकानिझमचा कमांडर सामी ओदेह या तिघांना या हल्ल्यात ठार करण्यात आलं आहे.

“उत्तर गाझामधील एका मजबूत आणि सुसज्ज भूमिगत कंपाउंडमध्ये दहशतवादी लपून बसले असताना आयएएफच्या लढाऊ विमानांनी हल्ला करून त्यांचा खात्मा केला. कंपाऊंडने हमास कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून काम केले आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांना दीर्घ कालावधीसाठी त्याच्या आत राहण्यास सक्षम केले”, असंही आयडीएफने म्हटलंय. दरम्यान, या हल्ल्याबाबत हमासकडून अद्यापही कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा >> “बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!

“गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या सर्व दहतवाद्यांचा पाठलाग आयडीएफ करेल. तसंच, जो कोणी धमकी देईल त्यांच्या विरोधात ऑपरेशन करेल”, असं IDF ने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >> VIDEO : बंकरच्या बाहेर क्षेपणास्त्रांचा अन् आतमध्ये प्रेमाचा वर्षाव; इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीत नवविवाहित जोडप्याचा डान्स व्हायरल!

इस्रायलकडून ७ ऑक्टोबरचा बदला घेण्यासाठी प्रयत्न सुरू

मुश्ताहा हा हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनवारचा जवळचा सहकारी होता. त्याने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाईंडला मदत केली होती. या हल्ल्यात जवळपास १२०० हून अधिक लोक मारले गेले आणि मध्य पूर्वेमध्ये युद्धाला तोंड फोडले. गेल्या आठवड्यात लेबनॉनच्या बेरूतमध्ये “अचूक स्ट्राइक” करून इस्रायलने इराण-समर्थित दहशतवादी गटाला मोठा धक्का देत हेझबोलाचा प्रमुख हसन नसराल्लाहलाही ठार केले होते. याच्यामुळे जगातील दहशतवाद संपुष्टात येईल, अशी आशा निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक राष्ट्रांकडून आली. तसंच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जगात दहशतवादाला स्थान नाही, अशा शब्दांत इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केले होते. तर, दुसरीकडे इराणच्या भारतातील राजदुतांनी इस्रायल-इराण युद्धात भारताने भूमिका मांडावी असे आवाहन केले आहे.