इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्धाला आता आठ दिवस झाले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) गाझापट्टीतून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली. त्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीवर क्षेपणास्र डागून प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून हे युद्ध सुरू झालं आहे. या युद्धात आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायली सशस्त्र दलांना एक मोठं यश मिळालं आहे. इस्रायली वायूदलाने हमासच्या कमांडरला ठार केलं आहे.
इस्रायली वायूदलाने शनिवारी रात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा ठार झाला आहे. वायूदलाने शनिवारी रात्री गाझा पट्टीतल्या हमासच्या अनेक तळांवर बॉम्बवर्षाव केला. गाजा पट्टीतल्या दक्षिण खान युनिस बटालियनवर केलेल्या हल्ल्यात बिलाल कदरा मारला गेला. बिलाल हा हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक होता.
बिलालने इस्रायलच्या किबुत्स निरिम आणि निरओज प्रातांत घुसून इस्रायली नागरिकांची कत्तल केली होती. बिलाल हा अनेक इस्रायली महिलांचं अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. बिलाल कदरा हा पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादी संघटनेतही वरिष्ठ पदावर होता.
गाझा पट्टीत एअर स्ट्राईक केल्यानंतर इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) एका निवेदनाद्वारे सांगितलं की आयडीएफने जेयतून, खान युनिस आणि पश्चिम जाबलियाच्या आसपासच्या प्रदेशातील हमासच्या तळांवर हल्ला केला. ज्या तळांवरून दहशतवादी संघटनां त्यांच्या कारवाया राबवत होत्या अशा ऑपरेशनल इमारतींवर बॉम्बहल्ला करण्यात आला. इस्रायली वायूदलाने हमासच्या इस्लामिक जिहाद परिषदेचं मुख्यालय, कमांड सेंटर, सैन्य तळ, लाँचर पॅड, अँटी टँक पोस्ट आणि वॉच टॉवर उध्वस्त केले.
हे ही वाचा >> “पुढील आव्हानासाठी तयार आहात? युद्धाचा पुढचा…”, इस्रायली पंतप्रधानांच्या सैनिकांना महत्त्वाच्या सूचना
हमासच्या हवाई गटाचा प्रमुख ठार
इस्रायल संरक्षण दलाच्या हवाल्याने ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयडीएफने केलेल्या हल्ल्यात हमासच्या हवाई गटाचा प्रमुख मुराद अबू मुराद हादेखील ठार झाला आहे. इस्रायलच्या वायूदलाने हमासच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं होतं. यावेळी दहशतवादी संघटनेचे सदस्य हवाई हल्ल्याची योजना आखत होते.