इस्रायल सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या अँटी टँक मिसाईल युनिटच्या प्रमुखाचा खात्मा केला. इब्राहिम अबू मघसिब असं हमासच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडमधील प्रमुखाचं नाव आहे. त्याला हमासचा मिसाईल मॅन म्हणूनही ओळखलं जात होतं.
इब्राहिम अबू मघसिबने याआधी इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र हल्ल्यांचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, इस्रायलच्या सैन्याने जमिनीवरून हमासवर हल्ले चढवलेच. याशिवाय इस्रायच्या नौदलाने हमासच्या अँटी टँक मिसाईल पोस्टही उद्ध्वस्त केल्या.
‘जी ७’ राष्ट्रांचा इस्रायलवर ‘मानवतावादी युद्धविरामा’साठी दबाव
इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये हवाई आणि जमिनीवरून हल्ल्यांची तीव्रता वाढवल्यानंतर तेथील पॅलेस्टिनींनी स्थलांतर करण्याचा वेग वाढला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदतीसाठी समन्वय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी जवळपास १५ हजार जणांनी उत्तर गाझामधून स्थलांतर केले. सोमवारी पाच हजार, तर रविवारी दोन हजार लोकांनी स्थलांतर केले होते.
‘जी ७’ देशांची एकत्रित भूमिका
‘जी ७’ या श्रीमंत औद्योगिक देशांनी सोमवारी युद्धाबद्दल एकत्रित भूमिका जाहीर केली. युद्धग्रस्त गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांपर्यंत विनाअडथळा अन्न, पाणी, औषधे आणि इंधन पोहोचते केले जावे आणि ‘मानवतावादी युद्धविराम’ घेण्यात यावा असे आवाहन जी७ कडून करण्यात आले. यामुळे इस्रायलवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
रुग्णालयातील इंधन संपण्याची भीती
गाझामधील अल कुद्स या रुग्णालयातील इंधन पुरवठा बुधवारी संपेल, असा इशारा पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट या मदतसंस्थेने दिला. इस्रायलने गाझामध्ये मदत सामग्री पोहोचती करण्यास परवानगी दिली असली तरी इंधनाचा पुरवठा मात्र रोखून धरला आहे.