इस्रायलने पुन्हा हेजबोलावर हल्ला केला असून दक्षिण लेबनानवर मोठ्या प्रमाणात क्षेपणात्रं डागण्यात आली आहेत. या हल्यात १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ४०० जखमी झाल्याची माहिती आहे. मृतकांमध्ये तरुण, महिला, चिमुकल्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने दक्षिण लेबनानमधील जवळपास ३०० ठिकाणांवर एकाचवेळी हल्ला केला. या हल्ल्यानंतर लेबनानमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागरिकांना तत्काळ इमारती खाली करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हल्ल्यापूर्वी लेबनानमधील नागरिकांना फोन कॉल
इंडिया टुडेने लेबनानमधील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यापूर्वी लेबनानमधील जवळपास ८० हजार नागरिकांना इस्रायलमधून कॉल आला होता. यावेळी त्यांना त्यांच्या इमारती खाली करण्यास सांगण्यात आले होते. लेबनानमधील टेलीकॉम कंपनी ओगेरोचे प्रमुख इमाद क्रेडीह यांनी याची पुष्टी करत, अशाप्रकारे हल्ल्यापूर्वी कॉल करून अराजकता निर्माण केली जाते आहे, असं म्हटलं होतं.
हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंकडून व्हिडीओ संदेश जारी
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ”मला लेबनॉनच्या लोकांना एक संदेश द्यायचा आहे. इस्रायलचा लढा तुमच्याशी नाही. आम्ही हेजबोलाशी लढत आहोत. ते तुमचा वापर करत आहेत, तुमच्या घरात क्षेपणास्र ठेवली जात आहेत आणि त्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आम्ही ही शस्त्रे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. कृपया तुम्ही सुरक्षित ठिकाणी जावं, असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
लेबनानही केला होता इस्रायलवर हल्ला
दरम्यान, शुक्रवारी लेबनानमधील हेझबोलाच्या सदस्यांकडे असलेल्या पेजरचा स्फोट होऊन अडीच हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. तर अनेकजणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी हेझबोलाने उत्तर देत इस्रायलवर १४० रॉकेट डागली होती. यावेळी हवाई दलाचे तळ आणि इस्रायलच्या तोफखाना मुख्यालयाला या हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले होतं. त्यानंतर इस्रायलच्यावतीने हेझबोलाला प्रत्युत्तर देण्यात आल होतं. या हल्ल्यात आठ नागरिक ठार झाले, ५९ लोक जखमी झाले होते.