उत्तर इस्रायलवर गुरुवारी रॉकेट हल्ला करणाऱ्या लॅबेनॉनला इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले. या देशाच्या हवाई दलाने बैरूट या लॅबेनॉनच्या राजधानीपासून दक्षिणेकडे अवघ्या सात कि.मी. अंतरावर असलेल्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले.
इस्रायलच्या सार्वभौमत्वावर केले जाणारे हल्ले कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. गुरुवारच्या रॉकेट हल्ल्यामुळे या राष्ट्राच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला, तेव्हा लॅबेनॉनच्या राजधानीतही ज्यांचे ‘प्रतिध्वनी’ उमटत राहतील असे हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली संरक्षण दलांचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल योआव मॉरदेचाई यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी याबाबत बोलताना आमच्यावर हल्ले करणारे किंवा तसा प्रयत्न करणारे अशा दोघांनाही आम्ही काय आहोत हे कळणे गरजेचे असल्याचे सांगत या हल्ल्यांचे समर्थन केले.