दोहा : इस्रायल आणि हमासदरम्यान गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाल्याचे वाटाघाटींची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला सांगितले. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याने इजिप्त आणि कतारच्या पुढाकाराने अनेक महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. त्याला अखेर बुधवारी यश आले. मात्र, यासाठीचा करार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युद्धविरामासाठी सहा आठवड्यांची योजना आखण्यात आली आहे. त्यामध्ये इस्रायली फौजा गाझामधून टप्प्याटप्प्याने माघार घेतील आणि इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कच्च्या कैद्यांच्या बदल्यात हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल. हमासने ‘रॉयटर्स’ला सांगितले की, त्यांच्या शिष्टमंडळाने वाटाघाटी करणाऱ्या मध्यस्थांकडे युद्धविराम करार आणि ओलिसांची सुटका याला मान्यता दिली आहे. त्यापूर्वी हमासने तोंडी मान्यता दिली होती असे पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्याने सांगितले. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियन सार युरोपच्या दौऱ्यावर होते, आपण या करारासंबंधी बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी मायदेशी परत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० नागरीक आणि सैनिकांची हत्या केली होती आणि २५० पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये केलेल्या युद्धात ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले. त्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या जवळपास दोन-तृतियांश इतकी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months zws